पुणे :रेल्वे सुरक्षा दलामार्फत रेल्वेच्या मालमत्तेचे रक्षण तसेच प्रवाशांची मदत करण्याचे काम केले जाते. ‘मिशन जीवन रक्षक’ अंतर्गत मध्य रेल्वेच्या आरपीएफ जवानांनी गेल्या आर्थिक वर्षात (२०२२-२३) ८६ प्रवाशांचे प्राण वाचवले. काहीवेळा यात स्वत:चा जीव धोक्यात घालून देखील सर्वसामान्य नागरिकाच्या प्राणाचे रक्षण आरपीएफच्या जवानांनी केले आहे.
८६ घटनांपैकी पुणे विभागात १३ व्यक्तींचा जीव वाचवण्यात आला आहे, तर मुंबई विभागात ३३, नागपूर विभागात १७, भुसावळ विभागात १७ आणि सोलापूर विभागात ६ व्यक्तींचा जीव वाचवण्याच्या घटनांची नोंद झाली आहे. रेल्वे सुरक्षा दलाच्या या जवानांना प्रवासी आणि रेल्वे मालमत्तेवरील गुन्हे, अतिरेकी हिंसाचार, रेल्वेच्या वाहतुकीतील अडथळा, हरवलेल्या मुलांची सुटका तसेच रेल्वे आणि रेल्वे परिसरात अंमली पदार्थ जप्त करणे, प्रवाशांचे सामान परत मिळवून देणे या जबाबजाऱ्या देखील तेवढ्याच सक्षमपणे पार पाडल्या आहेत.
आरपीएफच्या सतर्कतेने बहुतेक प्रकरणांमध्ये अशा प्रवाशांचे प्राण वाचवले आहेत, जे काहीवेळा निष्काळजीपणा करतात आणि धावत्या रेल्वेमध्ये चढताना किंवा उतरण्याचा प्रयत्न करतात. काही वेळा विविध वैयक्तिक कारणांमुळे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्यांचा देखील जीव वाचवण्यात आला आहे. तरी, प्रवाशांनी धावत्या रेल्वेमध्ये चढण्याचा अथवा उतरण्याचा प्रयत्न करून आपला जीव धोक्यात घालू नये असे आवाहन मध्य रेल्वे तर्फे करण्यात येत आहे.