पुणे :रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी दिवाळीनिमित्त हडपसर-नांदेड-हडपसर तसेच नागपूर-पुणे-नागपूरदरम्यान विशेष रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे क्र. ०७४०३ नांदेड - हडपसर एक्स्प्रेस नांदेड येथून रविवारी (दि. २३) रात्री साडेनऊच्या सुमारास निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पावणेअकराच्या सुमारास हडपसरला पोहोचेल.
रेल्वे क्र. ०७४०४ हडपसर-नांदेड एक्स्प्रेस हडपसर येथून सोमवारी (दि. २४) ११ वाजून ५० मिनिटांनी निघेल आणि रात्री पावणेबाराच्या सुमारास नांदेडला पोहोचेल. ही गाडी दौंड, कुर्डूवाडी, उस्मानाबाद, लातूर, लातूर रोड, घटनांदूर, परळी वैजनाथ, गंगाखेड, परभणी तसेच पूर्णा या स्थानकांवर थांबेल.
रेल्वे क्र. ०१४०५ नागपूर-पुणे एक्स्प्रेस २६ ऑक्टोबर आणि २ नोव्हेंबर रोजी दुपारी दीड वाजता निघून दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसहाच्या सुमारास पुण्यात पोहोचेल. रेल्वे क्र. ०१४०६ पुणे-नागपूर एक्स्प्रेस पुण्याहून २७ ऑक्टोबर आणि ३ नोव्हेंबर रोजी सकाळी पावणेअकराच्या सुमारास निघेल आणि दुसऱ्या दिवशी मध्यरात्री ३ वाजेच्या सुमारास नागपूरला पोहोचेल.
ही गाडी दौंड कॉर्ड लाइन, अहमदनगर, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा या रेल्वेस्थानकांवर थांबेल. २२ ऑक्टोबरपासून या दिवाळी विशेष रेल्वेसाठी बुकिंग सुरू होणार असल्याची माहिती पुणे रेल्वे विभागाच्या वतीने देण्यात आली.