पुणे : शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात दुसऱ्या जिल्ह्यांसह परराज्यातून बहुसंख्य विद्यार्थी, पर्यटक या शहरात ये-जा करत असतात. कोरोनामुळे लॉकडाऊन लागले आणि संपूर्ण देश थांबला. त्यात रेल्वेची सेवा देखील पूर्णपणे ठप्प झाली होती. आता सर्व पूर्ववत झाले तरी लॉकडाऊनमध्ये बंद केलेल्या एक्स्प्रेस गाड्या अद्याप सुरू झाल्या नाहीत. त्यामुळे प्रवाशांची गैरसाेय हाेत असून, या गाड्या कधी सुरू हाेणार असा प्रश्न उपस्थित हाेत आहे.
पुणे-सिकंदराबाद-शताब्दी एक्स्प्रेस, पुणे-सोलापूर - इंटरसिटी एक्स्प्रेस, पुणे - मुंबई-प्रगती एक्स्प्रेस आणि कोल्हापूर-पुणे - मुंबई - सह्याद्री एक्स्प्रेस यांसह अनेक पॅसेंजर रेल्वे अद्याप सुरू झालेल्या नाहीत. गर्दीच्या मार्गावरील या रेल्वेगाड्या बंद असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.
एक्स्प्रेसचे डबे वाल्हा लूप लाईनवर
शताब्दी एक्स्प्रेसचे डबे सध्या वाल्हा लूप लाईनवर उभे आहेत. गेल्या अडीच वर्षांपासून याकडे लक्ष देण्यास कोणीच तयार नसल्याने एसी डब्यांचे रंग उडले आहेत. पुणे रेल्वे स्थानकावर हे डबे उभे करण्यासाठी जागा असतानाही मुळात ते तिकडे का नेऊन उभे केले असा सवाल उपस्थित होत आहे. सिकंदराबाद, सोलापूर, मुंबई, कोल्हापूर या मार्गावरील एक्स्प्रेससह इतर पॅसेंजर रेल्वे सुरू कराव्यात, अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.
लॉकडाऊनपासून शताब्दी, इंटरसिटी, प्रगती आणि सह्याद्री या एक्स्प्रेससह इतर पॅसेंजर रेल्वे पुण्यातून सुटणाऱ्या आणि पुण्यामार्गे जाणाऱ्या बंद आहेत. यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. या गाड्यांच्या डब्यांची काळजी घेण्यासाठी, त्यांचा मेंटेनन्स करण्यासाठी कोणालाच वेळ नसल्याने चांगल्या नवीन डब्यांचे नुकसान होत आहे. हे नुकसान नेमके रेल्वेचे की सर्वसामान्यांच्या पैशांचे हे बघणे अधिक गरजेचे आहे.
- हर्षा शहा, अध्यक्ष, रेल्वे प्रवासी संघटना