पुणे :ऑनलाइन रेल्वे तिकीट काढताना प्रवासी कोणत्या गाडीत बर्थ शिल्लक हे तपासूनच तिकीट काढतात; मात्र त्यांना कधी कन्फर्म बर्थ मिळते, तर कधी वेटिंग मिळते. अशांसाठी संबंधित मार्गावर जर एखाद्या रेल्वेत बर्थ शिल्लक असेल, अशा प्रवाशांसाठी आयआरसीटीसी (इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन ) ने पुशअपची सुविधा सुरू केली असून, त्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. जवळपास ३० टक्के प्रवासी याचा लाभ घेत असल्याचे आयआरसीटीसी च्या पाहणीतून स्पष्ट झाले आहे.
आयआरसीटीसी ने प्रवाशांच्या सुविधेसाठी पुश अप नावाची सुविधा सुरु केली आहे. त्यामुळे प्रवाशांना कन्फर्म तिकिटासाठी वेगवेगळ्या गाड्यांच्या याद्या धुंडाळत बसण्याची गरज नाही. ज्या मार्गावर प्रवासी जात आहे. त्या मार्गावरील कोणत्याही एखाद्या गाडीत सीट उपलब्ध असेल, तर त्याचा मेसेज संबंधित प्रवाशाच्या मोबाईलवर जात आहे. प्रवाशांनी पुशअप नोटिफिकेशनसाठी आपला मोबाइल क्रमांक रजिस्टर करणे गरजेचे आहे. नोंदणी केलेल्या मोबइलवरच सीट उपलब्ध असल्याचा मेसेज पाठविला जाईल. यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही .
हे कसे काम करेल :
आपण ज्या मार्गावरच्या गाड्यांचे तिकीट काढणार आहात. उदा. पुणे ते मुंबईदरम्यान धावणाऱ्या गाड्यांचे तिकीट काढत असाल, तर तुम्हाला यादरम्यान धावणाऱ्या सर्वच गाड्यांचे तिकीट फुल्ल झाले असेल, तर त्यावेळी आपण पुश अप्चा पर्याय निवडू शकता. तसेच तुम्ही सर्च केलेल्या हिस्ट्रीचा आधार घेत त्यावरून त्या मार्गावर धावणाऱ्या कोणत्याही गाडीत सीट उपलब्ध होईल.
वेटिंगपासून सुटका-
अनेक प्रवासी लांब पल्ल्याच्या गाड्यात कन्फर्म तिकीट मिळावे, म्हणून चार महिने आधीच तिकीट काढण्याची घाई करतात, तर काही जण वेटिंग काढून कन्फर्म होण्याची वाट पाहतात. यात काहींचे कन्फर्म होतात, तर काहींचे नाही. आता या नव्या सुविधेमुळे मात्र प्रवाशांना कन्फर्म तिकीटच मिळेल. त्यामुळे प्रवाशांची वेटिंग तिकिटापासून सुटका होईल.
प्रवाशांना या सुविधेला चांगला प्रतिसाद लाभत आहे. जवळपास ३० टक्के प्रवाशांनी यासाठी आपले मोबाइल क्रमांक रजिस्टर केले आहे. भविष्यात यात आणखी वाढ होईल.
-पिनाकीन मोरावला, जनसंपर्क अधिकारी, आयआरसीटीसी, मुंबई