पुणे : चीनमध्ये नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची टेनिस स्टार ऋतुजा भोसले हिने रोहन बोपन्नासह मिश्र दुहेरीचे सुवर्ण पदक पटकावले. आता तिने २०२४च्या पॅरिस ऑलिम्पिक कोटा मिळवण्यासोबतच क्रमवारीत टॉप-२०० मध्ये स्थान पटकावून कारकिर्दीत अधिकाधिक ग्रँड स्लॅम स्पर्धा खेळण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
आशियाई क्रीडा स्पर्धेतून पुण्यात परतल्यानंतर ऋतुजाचा पुनित बालन ग्रुपचे (PBG) अध्यक्ष पुनित बालन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी जान्हवी धारिवाल बालन यांच्यासह महाराष्ट्र रणजी क्रिकेट संघाची माजी कर्णधार आणि ऋतुजाचे पती स्वप्नील गुगळे व तिची आई हे उपस्थित होते.
सत्कार समारंभात ऋतुजाने तिचा निर्धार बोलून दाखवला. “मी पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेवर लक्ष केंद्रीत केले आहे. इतर खेळांप्रमाणे टेनिसमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकून ऑलिम्पिक तिकीट निश्चित करता येत नाही. मला माझे रँकिंग अधिक चांगले करायचे आहे आणि ग्रँड स्लॅममध्ये प्रवेश सुनिश्चित करण्यासाठी ३२० वरून टॉप-२०० पर्यंत मजल मारायची आहे,” असे ऋतुजाने यावेळी सांगितले.
पुनित बालन यांच्याकडे टेनिस, हँडबॉल, टेबल टेनिस, खो खो, बॅडमिंटन, क्रिकेट, आर्म रेसलिंग आणि बुद्धिबळ या विविध क्रीडा लीगमधील आठ क्रीडा संघांचे मालकी हक्क आहेत. शिवाय विविध क्रीडा प्रकारांमध्ये देशभरातील सुमारे ५० इच्छुक खेळाडूंना आर्थिक सहाय्य प्रदान करतात.