Indian Youth Congress: युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन बंगळुरात; राहुल गांधी करणार मार्गदर्शन
By राजू इनामदार | Published: June 27, 2023 04:21 PM2023-06-27T16:21:37+5:302023-06-27T16:24:38+5:30
भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव व महाराष्ट्राचे प्रभारी एहसान खान यांनी काँग्रेस भवनमध्ये ही माहिती दिली...
पुणे : युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन १० ते १२ जूलै दरम्यान बंगळुरात होणार आहे. बेहतर भारत की बुनियाद हे अधिवेशनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. महाराष्ट्र व पुणे शहरातून अधिवेशनासाठी अनेक पदाधिकारी जाणार असून त्यामुळे युवक काँग्रेससाठी काँग्रेस पक्षाला उपयोगी होईल असा राष्ट्रीय कार्यक्रम दिला जाणार आहे.
भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव व महाराष्ट्राचे प्रभारी एहसान खान यांनी काँग्रेस भवनमध्ये ही माहिती दिली. पुणे शहर काँग्रेस प्रभारी विजयसिंह चौधरी, राष्ट्रीय सरचिटणीस वैष्णवी किराड, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्रथमेश आबनावे, शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहुल शिरसाट, महाराष्ट्र प्रदेश सचिव राजू ठोंबरे, सचिव रोहित बहिरट, पुणे शहर उपाध्यक्ष सौरभ अमराळे, पुणे शहर सचिव सचिन सुडगे यावेळी उपस्थित होते.
सन २०२४ ची लोकसभा निवडणूक, त्यात युवक काँग्रेसचा सहभाग व युवकांवरील जबाबदारी यासह देशातील विविध समस्यांवर विचारमंथन व्हावे, युवकांचे प्रश्न मांडण्यासाठी मार्गदर्शन व्हावे, या उद्देशाने हे तीन दिवसांचे अधिवेशन महत्वाचे आहे. कर्नाटकने परिवर्तनाचा मार्ग दाखवल्याने अधिवेशनासाठी कर्नाटकची निवड करण्यात आली. भारतीय युवक काँग्रेसचे प्रभारी कृष्णा अल्लावरु, राष्ट्रीय अध्यक्ष बी. व्ही. श्रीनिवास, अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, माजी खासदार राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे अन्य नेते अधिवेशनात मार्गदर्शन करतील अशी माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली.