पुणे : विश्वाची सांस्कृतिक प्रगल्भता सत्ताधाऱ्यांपेक्षा महापुरुष महात्मांनी वाढवली. सत्ता ही मुलतः भ्रष्ट असते म्हणूनच पक्षीय सत्तेचे राजकारण कोणालाही करू द्यावे. पण जनतेने मात्र विवेकशील बनून सत्याचे व सेवेचे समाजकारण करावे. भाई वैद्य यांचे जीवन ह्या संदर्भात आदर्श होते. भारताची राजकीय संस्कृती विकृतीने भरली असून लोकशाही समाजवाद धोक्यात असल्याचे प्रतिपादन माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.
भारतीय संविधान संवर्धन समितीच्या वतीने जेष्ठ परिवर्तनवादी नेते भाई वैद्य यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या भाई वैद्य स्मृती पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी भाई वैद्य स्मृती पुरस्कार महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह प्रमोद आडकर व रिपब्लिकन युवा मोर्च्याच्या अध्यक्षा सुवर्णाताई डंबाळे यांना डॉ. श्रीपाल सबनीस ह्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप सन्मानपत्र, तिरंगी शाल, संविधान प्रत असे आहे. ह्यावेळी व्यासपीठावर डॉ. अभिजित वैद्य, लताताई राजगुरू, विठ्ठल गायकवाड, विकास आबनावे आदी उपस्थित होते.
भाईंच्या आठवणींना उजाळा देताना डॉ. सबनीस म्हणाले की, भाई राजकारण, समाजकारण संस्कृतीचे संचित होते, आपल्या तत्वांशी कधीही तडजोड केली नाही. भारताच्या आजच्या उदासीनता पसरवणाऱ्या राजकारणात भाईंच्या विचारांची आमूलाग्र गरज आहे. विठ्ठल गायकवाड यांनी सूत्रसंचालन तर राहुल डंबाळे यांनी आभार मानले.