पुणे : भारताच्या पंतप्रधानांनी रशियन राष्ट्रप्रमुखांना युध्द थांबले पाहिजे असे सांगितले हाेते. मात्र, ते आपल्या हातात नव्हते. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत हा कायमच युध्द हाेउ नये अशी भूमिका मांडत आलेला आहे. ही युध्द करण्याची वेळ नाही असे मत देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केले.
सिंबायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज रेंजहिल्स कॅम्पस येथे एमबीए च्या विद्यार्थ्यांसाठी निवासी संकुलाचे उद्घाटन राजनाथ सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर ‘ फिल्ड मार्शल माणेकशॉ स्मृती व्याख्यानात ‘ राष्ट्रउभारणीत युवकांचे याेगदान’ या विषयावर ते बाेलत हाेते. यावेळी सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय (अभिमत विद्यापीठ) चे संस्थापक अध्यक्ष, कुलपती प्रा. डाॅ. शां. ब. मुजुमदार, प्र. कुलपती डॉ. विद्या येरवडेकर, कुलगुरू डॉ. रजनी गुप्ते, संचालक ब्रिगेडियर निवृत्त राजीव दिवेकर उपस्थित हाेते.
सिंह म्हणाले, भारताने मांडलेल्या प्रत्येक मुद्द्याचा आज आंतरराष्ट्रीय स्तरावर विचार केला जात आहे. एक विश्वसनीय आणि आवडते गुंतवणुकीचे ठिकाण झाले आहे. भारत लवकरच जगातील सर्वात माेठी तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था हाेईल असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. भारतात ऋषी मुनींनी प्राचीन काळापासून व्यवस्थापन, नियोजनासंबंधी ग्रंथात विचार व्यक्त केलेले आहेत. विद्यार्थ्यांनी आधुनिक आणि प्राचीन ज्ञानही आत्मसात केले पाहिजे तेव्हा त्यांना भारतीयत्व समजेल. सामाजिक अर्थिक वृध्दीमध्ये व्यवस्थापनाची भूमिका महत्वाची असते. देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी तरूणांनी याेगदान द्यावे.
शस्त्रसामग्री निर्यात १६ हजार काेटींवर
शस्त्रसामग्री निर्मित्ती मध्ये भारत आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करीत आहे. देशात २०१४ मध्ये ९ हजार काेटी रूपयांची निर्यात २०२३ मध्ये साेळा हजार काेटींवर गेली आहे. तसेच येत्या २०२६ पर्यंत ३५ ते ४० हजार काेटींपर्यंत जाईल असे राजनाथ सिंह म्हणाले.