पुणे : राजदूत म्हणजे देशाचा प्रतिनिधी असतो. दोन देशांमधील राजकीय उद्योग, सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्याची धुरा राजदुतांकडे असते. भारत आणि उत्तर कोरियाचे ऐतिहासिक संबंध गेल्या अनेक वर्षांपासून चांगले आहेतच; ते अधिक वृद्धींगत होण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे, असे मत अतुल गोतसुर्वे यांनी व्यक्त केले. पुणे विभागातील पासपोर्ट प्रक्रिया सुरळीत करण्यात चोख भूमिका बजावणारे व सध्या इंडियन कौन्सिल आॅफ कल्चरल रिलेशन विभागाचे संचालक अतुल गोतसुर्वे यांची नुकतीच उत्तर कोरियाचे राजदूत म्हणून नियुक्ती झाली आहे. त्या निमित्ताने सरहद संस्थेच्या वतीने त्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. सरहद भवनमध्ये झालेल्या या कार्यक्रमात खडके फौंडेशनचे संजीव खडके यांच्या हस्ते त्यांचा पुणेरी पगडी व उपरणे देऊन सत्कार करण्यात आला. त्यावेळी सरहद संस्थेचे अध्यक्ष संजय नहार व ट्रस्टी शैलेश वाडेकर, अनुज नहार हे उपस्थित होते. गोतसुर्वे यांनी मेक्सिको आणि क्युबा येथे काम करताना आलेले अनुभव उपस्थितांना सांगितले. उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किंग जोंग यांना भेटल्यावर भारताच्या वतीने त्यांना भगवान बुद्धांची मूर्ती भेट देईन, असेही ते म्हणाले. वयाच्या २८ व्या वर्षी भारतीय परराष्ट्र सेवेमध्ये दाखल झालेले व वयाच्या अवघ्या ४२ व्या वर्षी राजदूत झालेल्या या मराठी माणसाची प्रेरणा तरुणांनी घ्यावी, असे आवाहन संजीव खडके यांनी या प्रसंगी केले. संजय नहार यांनी प्रास्ताविक केले व शैलेश वाडेकर यांनी आभार मानले.
उत्तर कोरियासह भारताचे संबंध वृद्धींगत करणार : अतुल गोतसुर्वे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2018 8:15 PM
पुणे विभागातील पासपोर्ट प्रक्रिया सुरळीत करण्यात चोख भूमिका बजावणारे व सध्या इंडियन कौन्सिल आॅफ कल्चरल रिलेशन विभागाचे संचालक अतुल गोतसुर्वे यांची नुकतीच उत्तर कोरियाचे राजदूत म्हणून नियुक्ती झाली आहे
ठळक मुद्देउत्तर कोरियाच्या राजदूतपदी निवडीबद्दल सत्कार उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किंग जोंग भेटल्यावर त्यांना भगवान बुद्धांची मूर्ती भेट देईन