लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना (एमएसएलटीए) व डेक्कन जिमखाना आणि पीएमडीटीएच्या संलग्नतेने आयोजित पंचवीस हजार डॉलर पारितोषिक रकमेच्या केपीआयटी-एमएसएलटीए आयटीएफ महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत ऋतूजा भोसले, झील देसाई, वैदेही चौधरी या भारतीय खेळाडूंचे एकेरीतील आव्हान संपुष्टात आले. तर, दुहेरीत भारताच्या रिया भाटिया व रोमानियाच्या मिरीयम बियांका बुलगारु आणि ऋतुजा भोसले व इमिली वेबली स्मिथ या जोडीने अंतिम फेरीत प्रवेश केला.
डेक्कन जिमखाना टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत एकेरीच्या मुख्य ड्रॉच्या उपांत्यपूर्व फेरीत तिसऱ्या मानांकित ब्राझीलच्या लौरा पिगोस्सी हिने सातव्या मानांकित भारताच्या झील देसाईचा असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. हा सामना १ तास ४२ मिनिटे चालला. मागील आठवड्यात झीलने दिल्ली येथील १५ हजार डॉलर टेनिस स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. तसेच, या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरी गाठून १३ गुणांची कमाई केली आहे. त्यामुळे देशातील टेनिसपटूंच्या क्रमवारीत तिने चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे.
संघर्षपूर्ण लढतीत ग्रेट ब्रिटनच्या सहाव्या मानांकित इमेली वेबली-स्मिथ हिने वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश केलेल्या भारताच्या वैदेही चौधरीचा पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली. वैदेही हिने इमेली वेबली-स्मिथला विजयासाठी चांगलेच झुंजवले. हा सामना २ तास ३२ मिनिटे चालला. युक्रेनच्या पाचव्या मानांकित मारियाना झकारल्युक हिने भारताच्या व चौथ्या मानांकित ऋतुजा भोसलेचा पराभव करून दिमाखात उपांत्य फेरी गाठली. दुसऱ्या मानांकित रोमानियाच्या मिरीयम बियांका बुलगारु हिने आठव्या मानांकित रशियाच्या इरिना क्रोमाचेव्हाचा टायब्रेकमध्ये पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली.
दुहेरीत उपांत्य फेरीत भारताच्या रिया भाटियाने रोमानियाच्या मिरीयम बियांका बुलगारुच्या साथीत सौजन्या बाविशेट्टी व प्रार्थना ठोंबरे या जोडीचा टायब्रेकमध्ये पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. भारताच्या ऋतुजा भोसले हिने ग्रेट ब्रिटनच्या इमिली वेबली स्मिथ यांनी स्लोव्हाकियाच्या पीए लोव्हरीक व हंगेरीच्या ऍद्रियन नेगीचा पराभव करून अंतिम फेरी गाठली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल :
एकेरी : उपांत्यपूर्व (मुख्य ड्रॉ) फेरी : महिला:
लौरा पिगोस्सी, ब्राझील (३) वि.वि. झील देसाई (७) ६-४, ६-३,
मिरीयम बियांका बुलगारु, रोमानिया (२) वि.वि. इरिना क्रोमाचेव्हा, रशिया (८) ६-४, ७-६ (६),
इमेली वेबली-स्मिथ, ग्रेट ब्रिटन (६) वि.वि. वैदेही चौधरी २-६, ६-४, ६-३, मारियाना झकारल्युक, युक्रेन (५) वि.वि. ऋतुजा भोसले (४) ७-५, ६-२
दुहेरी गट : उपांत्य फेरी : ऋतुजा भोसले-इमिली वेबली स्मिथ, ग्रेट ब्रिटन (१) वि.वि. पीए लोव्हरीक, स्लोव्हाकिया-ऍद्रियन नेगी, हंगेरी (४) ४-६, ६-४, १०-७ रिया भाटिया-मिरीयम बियांका बुलगारु, रोमानिया (२) वि.वि. सौजन्या बाविशेट्टी-प्रार्थना ठोंबरे (३) ६-२, ७-६ (४).