लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना (एमएसएलटीए) व डेक्कन जिमखाना यांच्यातर्फे आणि पीएमडीटीएच्या संलग्नतेने आयोजित 25 हजार डॉलर पारितोषिक रकमेच्या केपीआयटी-एमएसएलटीए आयटीएफ महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत दुसऱ्या फेरीत भारताच्या ऋतूजा भोसले, झील देसाई, वैदेही चौधरी यांच्यासह रोमानियाच्या मिरीयम बियांका बुलगारु, रशियाच्या इरिना क्रोमाचेव्हा,ग्रेट ब्रिटनच्या इमेली वेबली स्मिथ,ब्राझीलच्या लौरा पिगोस्सी या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
डेक्कन जिमखाना टेनिस कोर्टवर खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेत एकेरीच्या मुख्य ड्रॉच्या दुसऱ्या फेरीत भारताच्या चौथ्या मानांकित ऋतुजा भोसलेने विजयी घोडदौड कायम ठेवत पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या श्राव्या शिवानी चिलकलापुडीचा सहज पराभव केला. हा सामना एक तास दहा मिनिटे चालला. चुरशीच्या लढतीत भारताच्या सातव्या मानांकित झील देसाई हिने सौजन्या बाविशेट्टीचा तीन सेटमध्ये पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. आठव्या मानांकित रशियाच्या इरिना क्रोमाचेव्हा हिने भारताच्या मिहिका यादवचे आव्हान असे संपुष्टात आणले.
वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश केलेल्या भारताच्या वैदेही चौधरी हिने क्वालिफायर व अव्वल मानांकित खेळाडूवर सनसनाटी विजय मिळविणाऱ्या सोहा सादिकचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. सहाव्या मानांकित ग्रेट ब्रिटनच्या इमिली वेबली-स्मिथ हिने जॉर्जियाच्या जास्मिन जेबवीचा पराभव करून आगेकूच केली. दुसऱ्या मानांकित रोमानियाच्या मिरीयम बियांका बुलगारुने भारताच्या रम्या नटराजनला पराभूत केले. ब्राझीलच्या तिसऱ्या मानांकित लौरा पिगोस्सी हिने भारताच्या पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या निधी चिलुमुलाचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
दुहेरीत उपांत्यपूर्व फेरीत भारताच्या ऋतुजा भोसलेने ग्रेट ब्रिटनच्या इमिली वेबली स्मिथच्या साथीत हुमेरा बहारमुस व श्रीवल्ली रश्मीका भामिदीप्ती यांचा तर, स्लोव्हाकियाच्या पीए लोव्हरीक व हंगेरीच्या ऍद्रियन नेगी यांनी भारताच्या जेनिफर लुईखेम व मिहिका यादव या जोडीचा पराभव करून उपांत्य फेरी गाठली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल : एकेरी : दुसरी (मुख्य ड्रॉ) फेरी : महिला:
इरिना क्रोमाचेव्हा, रशिया (8) वि.वि. मिहिका यादव, भारत 6-2, 6-2,
ऋतुजा भोसले, भारत (4) वि.वि. श्राव्या शिवानी चिलकलापुडी, भारत 6-1, 6-3,
मारियाना झकारल्युक, युक्रेन (5) पुढे चाल वि. पिए लोव्हरीक, स्लोव्हाकिया, 3-1; सामना सोडून दिला;
झील देसाई, भारत (7) वि.वि. सौजन्या बाविशेट्टी, भारत 4-6, 6-1, 6-2,
मिरीयम बियांका बुलगारु, रोमानिया (2) वि.वि.रम्या नटराजन, भारत 6-3, 6-1,
इमिली वेबली-स्मिथ, ग्रेट ब्रिटन (6) वि.वि. जास्मिन जेबवी, जॉर्जिया, 6-4, 6-3,
वैदेही चौधरी, भारत, वि.वि. सोहा सादिक, भारत, 6-4, 6-2,लौरा पिगोस्सी, ब्राझील, (3) वि.वि. निधी चिलुमुला, भारत, 6-0, 6-3,
दुहेरी गट: उपांत्यपूर्व फेरी:ऋतुजा भोसले-इमिली वेबली स्मिथ, ग्रेट ब्रिटन (1) वि.वि. हुमेरा बहारमुस-श्रीवल्ली रश्मीका भामिदीप्ती, 6-1,6-2; रिया भाटिया-मिरीयम बियांका बुलगारु, रोमानिया (2) वि.वि. निधी चिलुमुला-सौम्या विज 6-2, 6-4.पीए लोव्हरीक, स्लोव्हाकिया-ऍद्रियन नेगी, हंगेरी (4) वि.वि. जेनिफर लुईखेम-मिहिका यादव 6-2,6-2
सौजन्या बाविशेट्टी-प्रार्थना ठोंबरे, (3) वि.वि. अश्मीता इश्वरमूर्ती-भुवना कालवा 6-4, 6-2