पुणे : सॉफ्टवेअर (संगणक अज्ञावली) उत्पादनांची जागतिक बाजारपेठ तब्बल ५०० अब्ज डॉलरची असून, त्यात भारताचा वाटा सुमारे ८ अब्ज डॉलरचा आहे. हा व्यवसाय २०२५ पर्यंत ७० ते ८० अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचे लक्ष्य आहे. त्याचसाठी सरकारी पातळीवर विविध मंत्रालये व व्यवसायातील तज्ज्ञांकडून पोषक वातावरण तयार करण्याच प्रयत्न सुरु असल्याचे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेक्नॉलॉजी मंत्रालयाच्या सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क्स ऑफ इंडियाचे (एसटीपीआय) महासंचालक डॉ. ओंकार राय यांनी सांगितले. सॉफ्टवेअर एक्सपोर्टर्स असोसिएशन ऑफ पुणतर्फे (सीप) आयोजित आठव्या ‘पुणे कनेक्ट’ परिषदेचे उद्घाटन पुण्यात राय यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. सीपच्या कार्यकारी समितीचे सदस्य व पुणे कनेक्टचे प्रमुख अभिजित अत्रे, सीपचे अध्यक्ष अश्विन मेघा, उपाध्यक्ष विद्याधर पुरंदरे, पुणे कनेक्ट कार्यक्रम संचालक स्वप्नील देशपांडे या वेळी उपस्थित होते. तंत्रज्ञानातील सल्लागार जसप्रीत बिंद्रा लिखित ‘द टेक व्हिस्परर’ या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले. ‘फ्यूचर इन द कनेक्टेड वर्ल्ड’ ही या वर्षीच्या पुणे कनेक्टची मध्यवर्ती संकल्पना होती. सिस्कोचे भारत व सार्क देशांमधील अध्यक्ष समीर गद्रे यांच्या व्याख्यानासह अॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या आणि पुन्हा धीराने उभ्या राहिलेल्या अनमोल रॉड्रिग्स यांच्याशी गप्पांचा कार्यक्रम या वेळी घेण्यात आला. राय म्हणाले, सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क्स ऑफ इंडिया अंतर्गत देशात २८ उत्कृष्ट केंद्र (सेंटर ऑ फ एक्सलन्स) उभारली जात आहेत. त्याद्वारे माहिती तंत्रज्ञानात काम करणाऱ्या तज्ञांचा एक समुह तयार केला जात आहे. त्यासाठी विविध सरकारी विभागांकडून ६०० कोटींहून अधिक रुपयांची मदत देऊ केली जात आहे. कृत्रीम बुद्धीमत्त (आर्टिफिशियल इंटलिजन्स), इंटरनेट आॅफ थिंग्ज, ब्लॉक चेन अशा विविध विषयांसाठी ही सेंटर आॅफ एक्सलन्स काम करतील.व्यावसायिकांनी डिजिटल होणे म्हणजे केवळ कंपनीचे संकेतस्थळ किंवा अॅप तयार करणे नव्हे. तर, संपूर्ण व्यवसायाचा दृष्टीकोनच बदलणे अपेक्षित आहे. त्यामुळेच डिजिटल परिवर्तनाची प्रक्रिया बाहेरुन करुन घेऊन चालणार नाही. कंपनीच्या मालकाने अथवा प्रमुख कार्यकारी अधिकाºयाने त्यात स्वत: लक्ष घालायला हवे, असे बिंद्रा म्हणाले. --------------
सॉफ्टवेअरमधील भारताचा वाटा ८० अब्ज डॉलरवर नेणार : ओंकार राय
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2019 7:42 PM
सॉफ्टवेअर उत्पादनांची जागतिक बाजारपेठ तब्बल ५०० अब्ज डॉलर
ठळक मुद्देपुणे कनेक्ट परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी घोषणासरकारी पातळीवर विविध मंत्रालये व व्यवसायातील तज्ज्ञांकडून पोषक वातावरण तयार