पुणे : परिसरातील वाढते शहरीकरण आणि बदलते हवामान यामुळे भविष्यात शहरामध्ये वारंवार पूर येईल, असे संकेत हवामान तज्ज्ञ आणि पर्यावरण तज्ज्ञांनी दिले आहेत. विशेषत: एकेकाळी ‘हिल स्टेशन’ असलेले पुणे आता नागपूरसारखं तापत आहे. पाऊस देखील कमी वेळेत अधिक पडत आहे. त्यादृष्टीने पुणे महापालिका आता ८ बोटी खरेदी करणार आहे. संभाव्य धाेका पाहता भविष्यात सर्वांनाच बोटीतून प्रवास करणे भाग पडू शकते, त्यामुळे वाहनांऐवजी बाेट खरेदी करून ठेवा, असे म्हणण्याची वेळ पुणेकरांवर आली आहे.
गेल्या काही वर्षांपासून वातावरणात बदल होत आहे. आता त्याचे दृश्य स्वरूप देशभरात व पुण्यातही पाहायला मिळत आहे. पुण्याचे तापमान वाढत आहे आणि जमिनीचेही तापमान वाढत आहे. या तापमान वाढीमुळे अशा दुर्घटना घडत आहेत. हवामान बदल हे अतिवृष्टी, ढगफुटी आणि पूर यासाठी जबाबदार आहे. शिवाय असे संकट कोसळण्याची ठिकाणे देशभरात अनेक ठिकाणी आहेत.
उद्योगांमधून घातक वायूंचे होणारे उत्सर्जन, गाड्यांमधून निघणारा धूर हे वातावरण बदलाची प्रमुख कारणे आहेत. आपण समुद्राच्या पाण्यामध्ये थेट सांडपाणी सोडत आहोत. त्यामुळे समुद्राचे तापमान देखील वाढत आहे. एकंदरीतच या विषारी वायूमुळे ढगांची पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी होत आहे. त्यामुळे १५ ते २० दिवसांत कोसळणारा पाऊस हा एकाच दिवसात ढगफुटी झाल्यासारखा कोसळत आहे. परिणामी महापुरासारख्या नैसर्गिक आपत्ती ओढवतात, असे हवामानतज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी सांगितले आहे.
नदीकाठ सुधार प्रकल्पामुळे शहराचे नुकसान
महापालिका आयुक्तांना शहराची परिस्थिती माहिती आहे. परंतु, ते समोर येऊन पुणेकरांसमोर बोलत नाहीत. त्यांना समोर येऊन बोलण्यासाठी पत्र दिले आहे. नदीकाठ सुधार प्रकल्पामुळे शहराचे नुकसान होणार आहे. म्हणून नागरिकांनी एकत्र येऊन त्याविरोधात लढा देणे आवश्यक आहे. अन्यथा भविष्यात प्रचंड फटका पुणेकरांना सोसावा लागेल. - सारंग यादवाडकर, वास्तुविशारद, पर्यावरण अभ्यासक
जोरदार पाऊस पुण्याला सहन होणार नाही
सध्या पुण्यात रिमझिम पाऊस सुरू आहे. येत्या काही दिवसांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. जोरदार पाऊस पुण्याला सहन होणार नाही. त्यामुळे हळूहळू पडणारा पाऊसच चांगला आहे. तो जमिनीत मुरेल आणि भूजल पातळी वाढेल. - अनुपम कश्यपी, प्रमुख, भारतीय हवामानशास्त्र विभाग, पुणे
कमी व्यासाची गटारे
पुणे महापालिकेने अर्बन स्ट्रीट प्रोग्राम अंतर्गत तब्बल १३ कोटी रुपये खर्च करून जंगली महाराज रस्ता आणि १२ कोटी रुपये खर्च करून फर्ग्युसन रस्त्याचे सुशोभीकरण केले. जंगली महाराज रस्त्यावर ९०० मिमी व्यासाची आणि फर्ग्युसन रस्त्यावर ५०० मिमी व्यासाची पावसाळी गटार टाकली; पण या गटारांचे काम व्यवस्थित न झाल्याने पाणी वाहून जात नाही. डेक्कनला कमी व्यासाची गटारे आहेत. त्यामुळे गेल्या वर्षी इथे प्रचंड पाणी साठले होते. हीच परिस्थिती यंदा जोरदार पाऊस झाला तर होऊ शकते.