पुणे : आत्मनिर्भर भारत अंतर्गत युद्धासामुग्री बनवण्यासाठी स्वदेशी कंपन्यांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर टाटा उद्योग समूह आणि कल्याणी समूहाने बनवलेली चिलखती वाहने नुकतीच लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे आणि उपलष्करप्रमुख मनोज पांडे यांच्या उपस्थितीत लष्करात दाखल करण्यात आली आहे. या वाहनांमुळे युद्धात होणारा शत्रुचा गोळीबार, बॉम्बवर्षावात सैन्य सुरक्षित राहणार आहे. बॉम्बे सॅपर्स ग्रुपमध्ये एका कार्यक्रमात ही वाहने लष्कराला सुपूर्द करण्यात आली.
भारतीय लष्करात यापूर्वी रशिया किंवा अन्य देशांनी तयार केलेली चिलखती वाहने आहेत. मात्र आता स्वदेशी बनावटीची उच्च दर्जाची ही वाहने लष्करात दाखल झाली आहे. आत्मनिर्भर भारत अंतर्गत आणखी एक महत्त्वपुर्ण पाऊल पडले आहे. लडाख सारख्या अतिउंचावरील क्षेत्रात सैन्याला वेगाने पोहचवण्यासाठी टाटा उद्योग समुहाने संरक्षण संशोधन व विकास संघटना (डीआरडीओ) यांच्या मदतीने इन्फन्ट्री प्रोटेक्टेड मोबिलिटी व्हेहिकल्स (आयपीएमव्हीएल) ही चिलखती वाहने तयार केली आहे. महत्त्वाचे म्हणजे पुण्यातील कारखान्यातच या वाहनांची निर्मिती करण्यात आली आहे.
भारतीय सैन्याने वाळवंट आणि अतिउंचावरील भागात या वाहनांच्या चाचण्या घेतल्या आहेत. त्यामध्ये ही वाहने यशस्वी ठरली आहेत. वाहनांमध्ये डीआरडीओच्या डिफेन्स मेटॅलर्जिकल रिसर्च लॅबोरेटरीने विकसित केलेले एक्स्टर्नल अॅड-आॅन आर्मर प्रोटेक्शन पॅनेल्स आणि थर्मल साईट्ससह रिमोट कंट्रोल्ड वेपन सिस्टीमचा देखील समावेश आहे. यामुळे शत्रुची भूसुरंगे तसेच हायक्वालीटीचे शस्त्रसुद्धा या वाहनांना भेदू शकत नाही. या वाहनांची बांधणी लष्कराच्या मागणीनुसार करण्यात आली असून १२ युनिट देण्यात आली आहे.