पुणे : परदेशी कंपन्या हीनता आणि दीनतेचा फायदा घेत संस्कृती, मूल्ये आणि आदर्शाची पायमल्ली करत आहेत. पूर्वी भारतात ईस्ट इंडिया कंपनीचे राज्य होते. सध्याच्या काळात हजारो परदेशी कंपन्या भारताला गुलाम बनवण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. सरकार जागतिक व्यापार संघटनेशी बांधिल असल्याने परदेशी कंपन्यांवर नियंत्रण आणू शकत नाही. मात्र, नागरिकांनी स्वदेशी वस्तूंच्या वापराचा निर्धार पक्का केल्यास परदेशी कंपन्यांना आपोआपच देशातून गाशा गुंडाळावा लागेल, असे मत हरिद्वार येथील पतंजली विद्यापीठाचे कुलगुरू आचार्य बाळकृष्ण यांनी व्यक्त केले.लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टतर्फे लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते आचार्य बाळकृष्ण यांना लोकमान्य टिळक पुरस्काराने गौरवण्यात आले. पुरस्काराच्या एक लाख रुपयांच्या रकमेत स्वत:चे दीड लाख रुपयाची भर घालून बाळकृष्ण यांनी अडीच लाख रुपयांची देणगी ट्रस्टकडे सुपूर्त केली. या वेळी प्रणती टिळक, गीताली टिळक-मोने उपस्थित होत्या.‘बाबा रामदेव यांनी मीठ आणि कडूनिंब घरोघरी पोहोचवले. परदेशी कंपन्या ‘टूथपेस्ट में नमक है क्या’ अशी जाहिरात करू लागल्या आहेत. साबण विकण्याआधी आई-बहिणीला विकावे लागत आहे, याकडे आचार्य बाळकृष्ण यांनी लक्ष वेधले.ते म्हणाले, ‘आम्ही स्वदेशी वस्तूंचा वापर करू, हा निर्धार लोकमान्यांना वंदन करणारा आहे. ही सामूहिक कृती नाही, अशी टीका करत योगाच्या नावाने नाक मुरडले जात होते. बाबा रामदेव यांच्या योग अभियानाला २० वर्षे झाली. साबण, टूथपेस्ट अशा उत्पादनांच्या माध्यमातून परदेशी कंपन्यांकडून होणारी लूट ध्यानात आल्यामुळे स्वदेशी उत्पादनांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे.’
स्वदेशीचा निर्धार पक्का व्हावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2017 3:38 AM