पुणे : शस्त्रक्रियेदरम्यान निघणाºया विषारी वायुला शोषून घेत डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांचा बचाव करणारे पहिले स्वदेशी उपकरण पुण्यातील अभियंत्याने बनविले आहे. भारतीय गुणवत्ता परिषदेचा भाग असलेल्या ‘चाचणी आणि कॅलिब्रेशन प्रयोगशाळांसाठीचा (एन.ए.बी.एल.) राष्ट्रीय मान्यता मंडळाचा परवानाही या उपकरणाला मिळाला आहे.
लेसर किंवा इलेक्ट्रोसर्जिकल शस्त्रक्रियेदरम्यान विषायी वायू बाहेर पडतात. हे वायू शस्त्रक्रियेदरम्यान उपस्थित असलेले डॉक्टर व इतरांच्या आरोग्यासाठी घातक असतात. हे वायू शोषून घेण्यासाठी परदेशी व महागड्या उपकरणांचा वापर केला जातो. या उपकरणाची आवश्यकता लक्षात घेण्याबरोबरच डॉक्टरांची गरज, खर्च, उपकरणाचा उपयोग या सगळ्याचा वर्षभर अभ्यास करून अभियंता अतुल काळुसकर यांनी ‘एवन्स सेरीज ६’ (अङ्मल्लीर री१्री२ 6) हे पहिले स्वदेशी उपकरण बनविले आहे. विषारी वायू शोषून घेणाऱ्या उपकरणांची शस्त्रक्रिया विभागात आवश्यकता भासते. यात लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रियांमध्ये हे उपकरण ‘ट्रोकार’शी जोडले जाते आणि ओपन सर्जरीमध्ये ते ‘कॉटरी’ला जोडले जाते. यामध्ये वायू विविध फिल्टर आणि रेडिएशन चेंबरमधून जाऊन निर्जंतुक होतो, असे काळुसकर यांनी सांगितले.
सध्या भारतात अमेरिका, जर्मनी, जपान येथील कंपन्यांचे उपकरण मागवले जाते. त्यामुळे या उपकरणाचा खर्चही खूप आहे. त्या तुलनेत या भारतीय बनावटीच्या उपकरणाची किंमत निम्मी असून त्याचा देखभाल खर्चही निम्मा आहे, असेही काळुसकर यांनी स्पष्ट केले.
---------