इंदिरा गांधी येणार अन् पक्षापासून दूर गेलेले अनेक कार्यकर्ते लगेचच एकत्र, पुण्यातील प्रचाराची एक आठवण
By राजू इनामदार | Published: November 12, 2024 03:25 PM2024-11-12T15:25:46+5:302024-11-12T15:27:09+5:30
इंदिरा गांधी यांनी आणीबाणी उठवूून लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक जाहीर केली अन् पुण्यात प्रचाराला आल्या
पुणे : इंदिरा गांधी आणीबाणीमुळे वादग्रस्त झाल्या होत्या. देशभरात त्यांच्याविरोधात प्रचंड रोष होता. अशात त्यांनी आणीबाणी उठवूून लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक जाहीर केली. विरोधी पक्षात एकजूट नव्हती, त्यांचा एक असा पक्षही नव्हता, इंदिरा गांधी यांच्यावर टीका हाच त्यांचा एकमेव समान कार्यक्रम होता. मात्र आणीबाणी लादलेली असूनही इंदिरा गांधी यांच्या लोकप्रियतेत कसलाही फरक पडलेला नव्हता. त्याचे प्रत्यंतर १९७८ च्या सार्वत्रिक निवडणुकीत त्या प्रचारासाठी पुण्यात आल्या होत्या त्यावेळी आले.
निवडणुकीतील ही प्रचारफेरी आहे पुण्यातील भवानीपेठ परिसरातील. त्यावेळी पुण्यात त्यांच्याबरोबर कोणीही मोठे नेते राहिलेले नव्हते. पक्ष फुटलेला, नवा. त्यांचे पुण्यातील अध्यक्ष होते अमिनुद्दीन पेनवाले. शशिकांत कदम म्हणून त्यावेळचे एक नेते होते. पुण्यातच नाही तर एकूणच सगळीकडे या पक्षाला मोजकेच कार्यकर्ते होते. कार्यक्रमांना गर्दी नसायची.
पण इंदिरा गांधी येणार म्हटल्यावर सगळीकडे उत्साह पसरला. पक्षापासून दूर गेलेले अनेक पदाधिकारी कार्यकर्ते लगेचच एकत्र आले. हीच इंदिरा गांधी यांच्या नावाची किमया होती. कार्यकर्त्यांनी त्यांच्यासाठी खास सजवलेली जीप आणली. इंदिरा गांधी सुरूवातीला जीपमध्ये उभे राहण्यास तयार नव्हत्या. मात्र कार्यकर्त्यांनी फारच आग्रह केल्यामुळे अखेर त्या उभ्या राहिल्या. काळ्या रंगांच्या गॉगलमध्ये जीपमध्ये उभ्या राहिलेल्या त्यांना पाहून जीपच्या मागेपुढे लगेचच गर्दी झाली. अखेर पोलिस बंदोबस्त बोलवावा लागला. नंतरची फेरी बंदोबस्तातच पार पडली.