लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : भारत आणि इस्राईल हे दोन्ही देश एकमेकांना पूरक आहेत. त्यामुळे भविष्यात या दोन्ही देशांनी आपले संबंध आणखी दृढ करावेत, अशी अपेक्षा इस्राईलचे भारतातील राजदूत डॅनियल कारमॉन यांनी व्यक्त केली. भारत-इस्राईल या दोन देशांतील संबंधांना २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पुणे इंटरनॅशनल सेंटरच्या वतीने ‘भारत-इस्राईल, २५ वर्षीय संबंधांचा आढावा आणि भविष्य’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.पुणे इंटरनॅशनल सेंटरचे उपाध्यक्ष डॉ. विजय केळकर, विश्वस्त प्रमोद चौधरी, इस्राईलचे काउंसल जनरल डेव्हिड अॅकॉफ, पीआयसीचे मानद संचालक प्रशांत गिरबने आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.कारमॉन म्हणाले, ‘सुरुवातीला दोन्ही देशातील संबंध हे सामरिकदृष्ट्या जास्त महत्त्वाचे होते. मात्र, गेल्या काही वर्षांत शेती, व्यापार, शैक्षणिक संबंध, सायबरसुरक्षा, तंत्रज्ञान, आरोग्य, उद्योजकता आणि अन्नसुरक्षा आदी क्षेत्रांतही ते मोठ्या प्रमाणात प्रस्थापित होताना पाहायला मिळत आहेत. नजीकच्या भविष्यात हेच विषय घेत हे संबंध आणखी वाढविण्याचा प्रयत्न इस्राईल सरकार करणार असून भारत सरकारही त्याला सकारात्मक प्रतिसाद देईल, असा आमचा विश्वास आहे.’‘इस्राईलमध्ये शिकत असलेल्या परदेशी विद्यार्थ्यांमध्ये भारतीय विद्यार्थ्यांची टक्केवारी ही तब्बल १० टक्के इतकी आहे. येत्या काही आठवड्यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इस्राईलला भेट देणार आहेत. या भेटीत पुन्हा या दोन्ही देशांचे संबंध आणखी वाढतील, अशी आशा असल्याचेही त्यांनी नमूद केले.
भारत-इस्राईल संबंध आणखी दृढ व्हावेत
By admin | Published: June 23, 2017 4:57 AM