पुणे: एका पायाने चालता येत नाही. सोबत एलबो क्रचेस घ्यावी लागते. वजन ९० किलो आणि तरी देखील दुर्दम्य इच्छाशक्तीमुळे त्यांनी कळसूबाई (१६४६ मीटर) शिखर लिलया सर केले. हे धाडस केवळ सरकारचे डोके ठिकाणावर यावे यासाठी केले. धर्मेंद्र सातव असे त्या दिव्यांग कार्यकर्त्याचे नाव आहे. दिव्यांगांचे प्रश्न सुटावेत आणि सरकारचे याकडे लक्ष वेधावे म्हणून हा खटाटोप त्यांनी केला.
गेली अनेक वर्षांपासून सातव हे दिव्यांगांच्या प्रश्नांसाठी लढत आहेत. त्यांनी याबाबतचे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील पाठवले आहे. सातव यांनी पत्रात नमूद केले आहे की, सरकारी नोकरीतील दिव्यांग अनुशेष भरण्यात यावा व दिव्यांगांना व्यवसायासाठी कर्ज पुरवठा देण्यात यावा. या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मी पायाने 94% दिव्यांगा आहे. तरी देखील सर्वात उंच असलेले कळसूबाई शिखर चढणार आहे. त्याला अनुसरून १ जानेवारी २०२४ रोजी मी कळसुबाई शिखर सर केले.
सातव यांनी त्यांच्या मागण्यांमध्ये पुढील बाबी नमूद केल्या आहेत. सरकारने तत्काळ दिव्यांगांचा नोकरीतील अनुशेष आरक्षण कोटा पूर्ण भरावा, कंत्राटी भरती मध्ये 4% दिव्यांगांना नोकरी द्यावी, मागील पाच सहा वर्षापासून अपंग वित्त महामंडळ महाराष्ट्र राज्य यांनी एकाही दिव्यांगांना व्यवसायासाठी कर्ज दिले गेले नाही. त्यामुळे लाखो दिव्यांग उदरनिर्वाहासाठी स्वतःचा व्यवसाय करू शकत नाहीत. अपंगांना व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून द्यावे. या सातव यांच्या मागण्या आहेत.
कळसुबाई शिखर एका पायाने चढण्याचा उद्देश हा होता की, अपंगाला शारीरिक व्यंगामुळे कुणी कमजोर समजू नये. अपंग आपल्या शारीरिक अंगावर मात करून सरकारी सेवेत चांगल्या पद्धतीने नोकरी करेल. त्यामुळे नवीन वर्षात 2024 मध्ये सरकारने दिव्यांगांसाठी असलेल्या नोकऱी मधील 4% टक्के आरक्षण मधील सर्व कोटा भरून दिव्यांगांना नोकरी द्यावी. तसेच व्यवसाय साठी कर्ज देणे बंद असलेले ते तत्काळ सुरू करुन दिव्यांगांना व्यवसायासाठी कर्ज पुरवठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी धर्मेंद्र सातव यांनी केली आहे. सातव यांच्या सोबत प्रिया लोखंडे, बापू कोकरे, सिध्दराम माळी, दादा ठोंबरे, दादा काळूखे यांनी देखील सहभाग घेतला.