लोकमत न्यूज नेटवर्कशेलपिंपळगाव : अलंकापुरीचे वैभव आणि वारकरी बांधवांमध्ये पवित्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंद्रायणी नदीची प्रदूषणाच्या विळख्यात सुटका करण्यात येणार आहे. त्यासाठी विशेष आरखडा तयार करण्यात येणार असून त्याबाबत पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतली आहे.आगामी काळात आळंदीकरांना पिण्यासाठी शुद्ध पाणी उपलब्ध होईल अशी आशा निर्माण झाली आहे. तळवडे, चिखली, जाधववाडी, मोशी, चऱ्होली, डुडूळगाव आदी भागातील नाले आणि औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांमधून निर्माण होणारे सांडपाणी इंद्रायणी नदीपात्रात सोडले जाते. तसेच मानवी मैलामिश्रित सांडपाणीही प्रक्रिया न करता नदीपत्रात सोडले जाते.परिणामी इंद्रायणी प्रचंड प्रदूषित झाली आहे. यावर प्रभावी तोडगा काढण्यासाठी आणि नदीसुधार प्रकल्प हाती घेण्यासाठी महापालिका आयुक्त श्रवण हर्डीकर यांनी नदीची सध्यस्थिती पाहावी. त्याआधारे ठोस कार्यवाही करावी अशी मागणी आळंदीकरांनी आमदार महेश लांडगे यांना निवेदनाद्वारे केली होती. त्यापार्श्वभूमीवर शनिवारी आयुक्त हार्डीकर, आमदार महेश लांडगे यांनी महापालिका हद्दीतील इंद्रायणी नदीपात्र, आळंदीतील बंधारा व जलवाहिन्यांची पाहणी केली.यावेळी महापौर नितीन काळजे, आळंदीच्या नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे, पर्यावरण विभागचे कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी, शहरसह अभियंता दुधेकर, कार्यकारी अभियंता संजय भोसले, पाणीपुरवठा विभागाचे प्रवीण लडकत आदी उपस्थित होते.आळंदी नगर परिषद इंद्रायणीतील प्रदूषित झालेले १० एमएलडी पाणी नागरिकांसाठी उपयोगात आणते. मात्र, त्या पाण्यावर योग्य प्रक्रिया होत नसल्याने आळंदीकरांना पिण्यासाठी दुषित पाणीपुरवठा होत आहे. परिणामी आळंदीतील नागरी आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.सीएसआरमधून नदी संवर्धनइंद्रायणी नदीच्या दुतर्फा पिंपरी-चिंचवड महापालिका आणि चाकण हद्दीतील औद्योगिक कंपन्या मोठ्या प्रमाणात आहेत. सीएसआरच्या माध्यमातून इंद्रायणी नदीच्या दुतर्फा असलेल्या कंपन्यांना खर्च करावा लागणार आहे. त्याद्वारे रिव्हर डेव्हलपमेंट फंड उभा केला जाईल.मैला शुद्धीकरण प्रकल्प उभारणारज्या-ज्या ठिकाणी मैलामिश्रित पाणी नदीपात्रात सोडले जात आहे. अशा सर्व ठिकाणांची पाहणी करण्यात आली आहे. आवश्यक ठिकाणी मैलाशुद्धीकरण प्रकल्प, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. त्याद्वारे नदीपात्रात सोडल्या जाणा-या प्रदूषित पाण्यावर मोठ्या प्रमाणात नियंत्रण आणता येईल. त्याबाबत महापालिका स्तरावर लवकरच योग्य ती कार्यवाही करुन निविदा प्रक्रिया राबविण्यात येईल. - श्रवण हार्डीकर, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त.
प्रदूषणाच्या विळख्यातून इंद्रायणी होणार मुक्त
By admin | Published: May 07, 2017 2:32 AM