पुण्यातील इंद्रायणी मेडिसिटी ६ महिन्यांपूर्वीच मंजूर; बजेटमध्ये आता उल्लेख, प्रकल्पाला गती मिळणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2022 09:14 PM2022-03-11T21:14:58+5:302022-03-11T21:15:06+5:30
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सहा महिन्यांपूर्वीच मेडिसिटीचा विकास आराखडा (डीपीआर) तयार करण्यास परवानगी दिली असून, या संदर्भात जिल्हा परिषदेच्या वतीने राज्य शासन व आरोग्य विभागाला सादरीकरण करण्यात आले आहे
पुणे : ग्रामीण भागातील सर्वसामान्य लोकांना विविध प्रकारच्या आजारांचे अद्ययावत उपचार एकाच छताखाली देण्यासाठी गुडगाव- दिल्ली, कर्नाटक, अहमदाबादच्या धर्तीवर पुणे जिल्ह्यात पश्चिम महाराष्ट्रासाठी पहिली 'इंद्रायणी मेडिसिटी' उभारण्यात येणार आहे. या अंतर्गत सुमारे पाचशे एकरहून अधिक जागेत विविध प्रकारच्या आजारांसाठी २४ विभागांच्या स्वतंत्र इमारती निर्माण केल्या जाणार असून, जिल्ह्यातील खेड लोकसभा मतदार संघात हा प्रकल्प प्रस्तावित आहे. परंतु राज्याच्या अर्थसंकल्पात या प्रकल्पाचा केवळ उल्लेख केला असून, प्रत्यक्ष तरतूद मात्र करण्यात आली नाही. जिल्हा परिषदेच्या पुढाकाराने हा आराखडा तयार करण्यात आला असून, कागदावरच असलेला हा प्रकल्प प्रत्यक्षात अस्तित्वात येण्यासाठी आणखी किती वर्षे लागणार हे मात्र आता सांगणे कठीण आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सहा महिन्यांपूर्वीच मेडिसिटीचा विकास आराखडा (डीपीआर) तयार करण्यास परवानगी दिली असून, या संदर्भात जिल्हा परिषदेच्या वतीने राज्य शासन व आरोग्य विभागाला सादरीकरण करण्यात आले आहे. आता शासनाच्या अर्थसंकल्पात यांचा उल्लेख करण्यात आल्याने प्रकल्पाला गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
असा असेल इंद्रायणी मिडिसिटी प्रकल्प
- एकाच ठिकाणी १० ते १५ हजार खाटांची सुविधा उपलब्ध
- तब्बल 500 एकर जागेत मेडिसिटी प्रकल्प
- या प्रकल्पात ट्रॉमा क्रिटिकल, हृदयरोग, मूत्रपिंड, मेंदूरोग, दंतचिकित्सा, बालरोग, नेत्ररोग, एंडोक्रायनोलॉजी, गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजी, मूत्ररोग, हिमॅटोलॉजी, अवयव प्रत्यारोपण, आयूष जनरल रुग्णालय, मानसिक पुनर्वसन केंद्र, स्त्रीरोग, रेडिओलॉजी, पुनर्वसन केंद्र, स्पोर्ट्स मेडिसीन, कॅन्सर तब्बल 24 स्वतंत्र रुग्णालयांचा समावेश असेल.
- संशोधनाला चालना देण्यासाठी क्लिनिकल रिसर्च सेंटर, जेनेटिक मेडिसीन रिसर्च सेंटर, ओबेसिटी अँड डाएट मॅनेजमेंट, जीन्स बँक, रक्तपेढी, मेडिकल लायब्ररी डेटा सेंटर, स्टेम सेल अशा रुग्णालयांशी अन्य परस्परपूरक संस्थाही असणार
- पीएमआरडीए'कडे असणार प्रकल्प उभारणीची जबाबदारी