पुणे : मावळातील इंद्रायणी तांदूळ उत्पादकांना जिल्हा बँकेतर्फे मदतीचा हात मिळाला असून त्यांना हमीभावापेक्षा जास्त दर देऊन त्यांच्या घामाला दाम देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्यासाठी विविध कार्यकारी संस्थांच्या माध्यमातून भेसळमुक्त तांदळाची खरेदी सुरू झाली आहे. त्यातून मावळचा इंद्रायणी असा ब्रँड स्थापित करण्याचा इरादा आहे.
जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या वेळी संचालक रमेश थोरात, व्यवस्थापकीय संचालक विजय टापरे, संजय शितोळे, उपक्रमाचे माऊली दाभाडे, भाऊसाहेब दाभाडे, संजय ढोरे उपस्थित होते. मावळातील इंद्राणी तांदळाची ख्याती राज्यभर आहे. मात्र, तो ओरिजिनल स्वरूपात मिळत नसल्याची तक्रार ग्राहकांकडून होत होती. तसेच व्यापाऱ्यांकडून राज्य सरकारने ठरवून दिलेल्या हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी केली जात होती. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत होता. तसेच त्यांच्या कष्टाचे पैसेही वेळेत मिळत नव्हते. त्यामुळेच ग्राहकांचा तसेच शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन जिल्हा मध्यवर्ती बँकेने विविध कार्यकारी संस्थांच्या मदतीने शेतकऱ्यांना आर्थिक बळ देण्याच्या उद्देशाने यंदा प्रथमच तांदळाची खरेदी सुरू केली आहे. त्यासाठी सरकारच्या हमीभावापेक्षा जादा दराने ही खरेदी केली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वाढीव दराने किंमत तर ग्राहकांना वाजवी दरात ओरिजिनल तांदूळ उपलब्ध होणार आहे.
इंद्रायणी तांदळासाठी राज्य सरकारचा हमीभाव सध्या २०.६० पैसे इतका आहे. मावळ तालुक्यातील ११ विविध कार्यकारी संस्था सुमारे १५ हजार शेतकऱ्यांकडून २४ रुपये प्रति क्विंटल दराने साळीची खरेदी करणार आहे. व्यापारी हीच साळ १८ ते २० रुपये दराने खरेदी करतात. त्यामुळे विविध कार्यकारी संस्थांनी खरेदी केलेल्या दरामुळे शेतकऱ्यांना ४ ते ६ रुपये जादा दर मिळणार आहे. प्रक्रियेनंतर एक क्विंटल साळीपासून ५० ते ५५ किलो तांदूळ मिळतो. त्यामुळे हा तांदूळ ५० रुपये किलोंना पडणार आहे. त्यानंतर त्याचे पॅकिंग व मार्केटिंग गृहित धरून ग्राहकांसाठी हा दर ५५ रुपये प्रति किलो असा ठेवण्यात आला आहे. त्याचा विक्रीचा प्रारंभ १२ डिसेंबरला मार्केट यार्डात होणार आहे. शहरातील सोसायट्यांनी किमान एक टनाची मागणी केल्यास त्यांना हा तांदूळ पोच केला जाणार असल्याचे जिल्हा बॅंकेचे वरिष्ठ अधिकारी निरज पवार यांनी सांगितले. या सर्व संस्थांनी ३ हजार टन तांदळाच्या खरेदीचे उद्दिष्ट ठेवले आहे.