पुणे: अवजड वाहनांना बंदी घालूनही नियमांचे सर्रास उल्लंघन होत असलेला तळेगाव एमआयडीसीला जोडणारा इंद्रायणी नदीवरील पूल सोमवारी (दि.16) रोजी कोसळला. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील ही घटना आहे. या पुलावरून वाहतूक करण्यास दोन वर्षांपूर्वीच अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली होती. इतकेच नव्हे तर त्याकरिताचे अडथळेही प्रशासनाने बसवले होते. मात्र जे सी बी'च्या साहाय्याने ते अडथळे तोडून डंपरसारख्या वाहनांची दररोज ये-जा सुरू होती.
त्याचाच परिणाम म्हणून आज सकाळी 6 च्या सुमारास मधल्या मोरीचा स्लॅब कोसळला. त्या आवाजाने भयभीत झालेल्या गावकऱ्यांनी पुलाकडे धाव घेतली असता त्यांना हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर तात्काळ एमआयडीसी पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. सध्या पोलीस घटनास्थळी पोहोचले असून कोणते वाहनाचा यात अपघात झालेला नाही ना याचा शोध घेतला जात आहे.
त्यांचा काळ आला होता पण...ऑगस्ट 2016 रोजी कोकणातील सावित्री नदीवरील दुर्घटनेनंतर याही पुलाची तपासणी करून तो वाहतुकीस योग्य असल्याचा निर्वाळा प्रशासनाने दिला होता. आज मात्र पूल कोसळण्याच्या थोडाच वेळ आधी एमआयडीसीमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या बस पुलावरून गेल्या होत्या. नशीब बलवत्तर म्हणून या बस पुढे गेल्यावर ही घटना घडली. अन्यथा मोठी दुर्घटना घडण्याचा संभव होता.