आळंदी : डुडुळगाव येथून वाहणाऱ्या इंद्रायणी नदीला जलपर्णीचा विळखा पडल्याने नदीचे पावित्र्य जपण्यासाठी, तसेच इंद्रायणी नदीच्या प्रदूषणमुक्तीसाठी एक पाऊल भावी पिढीसाठीचा संदेश देत इंद्रायणी नदी उगम ते संगम प्रदूषणमुक्तीसाठी डुडुळगाव घाटावर इंद्रायणी नदी स्वच्छता अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यात सुमारे ३ ट्रक जलपर्णी नदीपात्रातून बाहेर काढण्यात आली.
इंद्रायणी नदी स्वच्छता अभियानाचे आयोजन अविरत श्रमदान, सायकलमित्र, महेशदादा स्पोर्ट्स फाऊंडेशन, तसेच डी. वाय. पाटील इंजिनिअरिंग कॉलेज, रानजाई प्रकल्प देहूचे प्रमुख सोमनाथ आबा मुसुडगे यांचे मार्गदर्शन मिळाले. इंद्रायणी नदी स्वच्छता अभियानात विविध संस्थांचे पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते, डुडुळगावचे ग्रामस्थ सहभागी झाले होते. यात सचिन लांडगे, नगरसेवक विजय मामा लांडे, योगेश तळेकर, सोमनाथ आबा मुसुडगे आदींचा समावेश होता.
डुडुळगाव येथील इंद्रायणी नदी घाटालगतच्या स्मशानभूमीसमोरील इंद्रायणी नदीतील जलपर्णी काढण्यात आली. यावेळी सोमनाथ आबांच्या मार्गदर्शनाखाली अल्प वेळेत वायर रोप, बांबूच्या सहाय्याने जलपर्णी नदीपात्राबाहेर घाटावर आणण्यात आली. उपस्थितांनी उत्स्फूर्तपणे जलपर्णी नदीबाहेर आणण्यास हातभार लावत सामूहिकपणे नदीतून वाहून आणत एका ठिकाणी आणण्यास एकमेकांना मदत केली. मोशी घाटाप्रमाणे डुडुळगावलादेखील दोर बांधण्यात आले. उगम ते संगम इंद्रायणी नदी जलपर्णीमुक्तीच्या पुकारण्यात आलेल्या एल्गारला गती देण्यात आली. डुडुळगाव परिसरात पुढील काही दिवस हे स्वच्छता अभियान सुरू राहणार आहे. त्यानंतर चिंबळी बंधारा, केळगाव, आळंदी बंधारा नदीघाटावर जलपर्णी व प्रदूषणमुक्त इंद्रायणी नदीसाठी काम होणार आहे. या नदी स्वच्छता अभियानात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन अविरत श्रमदान, सायकलमित्र, महेशदादा स्पोर्ट्स फाऊंडेशन, डुडुळगाव ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आले आहे.इंद्रायणी नदीचे पावित्र्य जपण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आतापर्यंत या स्वच्छतामोहीमेद्वारे जवळपास ३ ट्रक जलपर्णी काढण्यात आली आहे. भविष्यात ही मोहिम सुरूच राहणार असून स्वच्छतेसाठी सर्व आधूनिक मार्गाचा वापर करण्यात येणार आहे.