दीपक होमकर
पुणे : प्रचंड इच्छाशक्ती ही जगातील कोणत्याही आजारावरील सर्वात प्रभावी उपाय असतोच याची अनेक उदाहरणे आपण आसपास पाहतो, मात्र कर्करोगासारख्या आजाराला हरवून सामान्य माणूस नव्हे तर आयर्नमॅन बनल्याची कहाणी म्हणजे तुम्हाला एखाद्या जादुगाराची दंतकथा वाटेल; पण ही किमया साधली आहे आयपीएस अधिकारी निधीन वल्सन यांनी.
कर्करोग म्हणजे अटळ मृत्यू, अशी ज्यांची धारणा असते त्या साऱ्यांना चोख उत्तर म्हणजे निधीन वल्सन. वल्सन यांना काही महिन्यांपूर्वी नॉन हॉजकिन्स लिम्फोमा हा कर्करोग झाला होता. भारतीय पोलिस सेवेमध्ये दाखल होऊन उत्तम जबाबादारी आणि कौटुंबिक आयुष्य सुरू असताना अचानक हा भयानक आजार उद्भविल्याने निधीन यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांची पायाखालची जमीन सरकली. त्यावर तातडीने उपचार सुरू झाले. औषधे केवळ आजार थांबविण्यासाठी मदत करतील त्यावर खरी मात करायची असेल तर प्रचंड सकारात्मक मानसिकता असली पाहिजे, असा मंत्र डॉक्टरांनी दिला आणि मग निधीन यांनी मनाशी पक्की गाठ बांधली की त्यांना केवळ आजारातून बरे व्हायचे नाही तर जगातील तमाम कर्करोगाने ग्रासलेल्या रुग्णांसमोर एक आदर्श बनायचा, त्यांना बरे होण्याची प्रेरणा द्यायची. त्यानंतर त्यांनी उत्तम मॅरेथॉन पट्टू बनण्याचा सराव केला. अनेक मॅरेथॉन, सायक्लोथॉनमध्ये त्यांनी सहभाग घ्यायला सुरुवात केली. नॉन हॉजकिन्स लिम्फोमा यामुळे प्रचंड थकवा येणे, ओटीपोटात कमालीच्या वेदना, सूज येणे असे त्रास होतात मात्र त्या वेदना सहन करत आणि पचवित त्यांनी त्यांचा सराव सुरू ठेवला आणि मग पुढे त्या वेदना कमी कमी होत गेल्या आणि त्यांनी कर्करोगावर पूर्ण मात केली. इतकेच नव्हे गेल्याच वर्षी गोव्यात झालेल्या भारतातील पहिल्या आयर्नमॅन स्पर्धाही ते यशस्वी पार पाडताना २१ किमी धावणे, दीड किमी पोहणे आणि ९० किमी सायकलिंग या गोष्टी केवळ आठ तास तीन मिनिटांत पूर्ण केले.
‘उम्मीद की-रन’चे उद्घाटन निधीन यांच्या हस्ते
कर्करोगाने त्रस्त असलेल्या आणि त्यांच्यासह या आजाराशी लढण्यासाठी सज्ज असलेले रुग्णांचे नातेवाईक, मित्र, डॉक्टर्स यांच्यासाठी पुण्यात पहिल्यांदाच ‘उम्मीद की-रन’ ही मॅरेथॉन होत आहे. चार फेबुवारी होणाऱ्या या आगळ्या वेगळ्या मॅरेथॉन-वॉकेथॉनच्या उद्घाटनासाठी निधीन वॉल्सन पुण्यात येणार आहेत. यावेळी कर्करोगावर मात कशी करावी, याबाबत त्यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन होणार आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी टाऊनस्क्रीप्ट बेवसाइटवरून नोंदणी करता येणार आहे.