शिवानी खोरगडे
पुणे - निवृत्ती महाराज देशमुख म्हणजेच इंदोरीकर महाराज या नावामागे ओघाओघानं वादविवाद आलेच. समाजाला प्रबोधनाचे धडे देणारे इंदोरीकर महाराज कीर्तन थांबवत अचानक चिडले मग त्याची चर्चा तर होणारच. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात हा प्रकार घडला आहे. जेथे इंदोरीकर महाराज कीर्तन करता करता अचानक थांबले आणि 'अय, बंद कर ते..' म्हणत टोचून बोलू लागले.
यावेळी इंदोरीकर महाराज म्हणाले की, "माझ्या विधानांचा विपर्यास केला जातो. माझ्या कीर्तनात कोणालाही दुखवण्याचा हेतू नसतो. मी समाज सुधारण्यासाठी आपल्या माणसांना बोलतो, पण प्रसिद्धीसाठी हा बोलतो असा विपर्यास केला जातो अशी खदखदही इंदोरीकर महाराजांनी मंचावरून व्यक्त केली. किर्तन सुरू असताना एक व्यक्ती ते मोबाईल शूट करत होते. सोशल मीडियाचे ते प्रतिनिधी होते. त्यांच्याकडे बघून महाराज चिडले. त्यामुळे इंदोरीकर महाराजांनी मोबाइल आणि यूट्यूब चॅनेलचा धसकाच घेतलाय की काय असा प्रश्न पडला आहे.
आधी मोबाइल बंद कर पहिले, जरा भानावर राहत जा, असं इंदोरीकर महाराजांनी त्याला सुनावलं. काहीच दिवसांपूर्वी इंदोरीकर महाराजांनी यूट्यूब चॅनल वाल्यांवर आरोप केला होता. "माझ्या कीर्तनाचे व्हिडीओ युट्यूबवर अपलोड करून अनेकांनी लाखो रुपये कमावले म्हणत अकोल्यातल्या कौलखेड या ठिकाणी कीर्तन करताना इंदोरीकर महाराजांनी असा आरोप केला होता. "जवळपास चार हजार लोकांनी कोट्यवधी रूपये कमावले. त्यांच्यामुळेच आपल्या अडचणीत वाढ झाली आहे," असं म्हणत अशा लोकांची मुले दिव्यांग जन्माला येतील, हे वादग्रस्त वक्तव्य सुद्धा त्यांनी केलं होतं.
त्यानंतर या वक्तव्याच्या बातम्या झाल्यात आणि राज्यभरातून इंदोरीकर महाराजांवर टीकेची झोड उठली.. त्यानंतर महाराजांनी सोशल मीडिया चॅनेलवाल्यांचा धसकाच घेतल्याचं दिसून येतंय. कारण कीर्तन सुरू असताना कोणी मोबाइलवर व्हिडिओ रेकॉर्ड करत असेल तरीही ते अलिकडे दम देताना दिसून येतात. इंदोरीकर महाराजांची किर्तने तरूणाईत प्रचंड व्हायरल होत असतात. परंतु अनेकदा त्यांच्या महिलांबद्दल विधानांवरून वाद निर्माण होतात.