कुरकुंभ - सध्या सुरू असलेल्या राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह दिनाचे औचित्य साधून कुरकुंभ येथील प्रत्येक कंपनीच्या प्रवेशद्वारावर सुरक्षेची माहिती देणारे विविध फलक झळकताना दिसत आहेत. या आठवड्यात प्रत्येक कामगाराला सुरक्षेविषयी प्रशिक्षण दिले जाते. प्रत्येक कामगाराला त्याच्या कामाच्या वेळेस सुरक्षेची शपथ दिली जाते. सुरक्षेविषयी विविध घोषणा लिहिलेले बॅच लावून जणू सुरक्षेचा फार्स त्यांच्याभोवती आवळला जाताना दिसत आहे, मात्र प्रत्यक्षात याची अंमलबजावणी अगदी शून्य असून, सुरक्षेचे धडे फक्त कागदावरच असल्याचे वास्तव कुरकुंभ येथील औद्योगिक क्षेत्रात दिसून येत आहे.४ ते ११ मार्च हा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह म्हणून साजरा केला जातो. यामध्ये औद्योगिक सुरक्षेविषयी विविध माहिती व ज्ञान प्रत्येक कामगाराला देऊन स्वत: सुरक्षित राहून सुरक्षित काम करण्याविषयी त्याची मानसिकता करण्याचा प्रयत्न हा विविध प्रशिक्षण व प्रायोगिक प्रात्यक्षिके सादर करून दाखवला जातो. औद्योगिक क्षेत्र सुरक्षित ठेवून आपला परिसर कसा सुरक्षित ठेवावा याबाबत व्यवस्थापन आपआपल्या परीने प्रयत्न करीत असतात. मात्र प्रत्यक्षात वर्षभर त्याची अंमलबजावणी खुद्द कंपनी व्यवस्थापन किती प्रमाणात करते हे पाहणे आवश्यक आहे. एकीकडे कामगारांना सुरक्षेचे धडे देण्याचे काम करायचे व दुसरीकडे कामगारांना सुरक्षेच्या यंत्रणा न देताच काम करवून घ्यायचे, असा दुतोंडी कारभार सध्या याभागात सर्रास होताना दिसून येत आहे. कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रात आजवर झालेले अपघात पाहता याला दुजोरा मिळतो.रासायनिक प्रकल्प असणाºया या औद्योगिक क्षेत्रात अगदी बोटावर मोजण्याइतक्याच कंपनी प्रशासनाकडे सुरक्षेची उपयोगी साधने असल्याचे आढळून येते. जवळपास शंभरपेक्षा जास्त छोटे-मोठे उद्योग या ठिकाणी आहेत; मात्र अगदी तुरळक ठिकाणीच रुग्णवाहिका आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात ही औद्योगिक सुरक्षा फक्त दोन अग्निशामक वाहन असणाºया गाड्यांवर अवलंबून आहे, तर रासायनिक प्रकल्पातील आग विझविण्याचे काम करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ देखील या ठिकाणी दिसून येत नाही. त्यामुळे बहुतांश वेळेस अपघाताची तीव्रता अपुरी यंत्रणा व अपघाताच्या जागी फक्त उशीर झाल्यामुळे वाढली असल्याचे निदर्शनास येत आहे.एकंदरीतच कुरकुंभ येथील काही कंपनी व्यवस्थापन सोडले तर सुरक्षेचा बोजवारा उडालेला असताना फक्त प्रवेशद्वारावर फलक लावल्याने सुरक्षा वाढेल का? हे खुद्द कंपनी व्यवस्थापनाने तपासणे गरजेचे आहे. कुठल्याही प्रकारचा औद्योगिक प्रकल्प उभा करताना सुरक्षा यंत्रणा व सुरक्षाविषयी उपकरणे उपलब्ध करून देणे, कामगारांना याबाबत चांगले प्रशिक्षण देणे व अपघातानंतर लागणारी यंत्रणा जवळपासउभारणे अशी कामे प्रत्यक्षात केली तरच राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह साजरा होईल अन्यथा फक्त पंचतारांकित प्रशिक्षण देण्याचा फार्स करून एखाद्या मनोरंजनाचा कार्यक्रम केल्यासारखे काही क्षण नाटक करणे हे योग्य नाही.अपुरी औद्योगिक यंत्रणाअपुरी यंत्रणा व याबाबत असणारे अज्ञान यामुळे कामगारांना आपला नाहक जीव गमवावा लागतो व कंपनी व्यवस्थापन अपघातात मृत कामगाराला किती आर्थिक मदत केली याचे ढोल वाजवत बसतात. व याला जबाबदार सरकारी यंत्रणादेखील फक्त आर्थिक संबंध जपण्यापलीकडे काहीच करीत नसल्याचे आजवरचा इतिहास सांगतो.एक हजार किंवा त्याच्या जवळपास कामगार असणाºया कंपनीत फक्त एक सुरक्षा अधिकारी असतो, मात्र त्या अधिका-याचे याकडे जास्त लक्ष नसते, त्यामुळे जर कंपनी व्यवस्थापनाने सुरक्षा यंत्रणा पुरवली नाही तर सुरक्षा अधिकाºयाला काम बंद करण्याचा अधिकार आहे का? आणि असेल तर तो काम का बंद करीत नाही?
औद्योगिक सुरक्षा फक्त कागदावरच! राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाचा फार्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 5:24 AM