पुणे : उद्योगाचा प्रस्ताव बँकेकडे शिफारशीसह पाठविण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्रातील निरीक्षकाने साडेतीन हजार रुपयांची लाच घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चंद्रभान परशुराम गोहाड (वय ५७, वर्ग ३ जिल्हा उद्योग केंद्र, शिवाजीनगर) असे लाच घेतलेल्या निरीक्षकाचे नाव आहे. तक्रारदार यांनी प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत खिळे उद्योग निर्मितीच्या प्रकल्पासाठी अर्ज केला होता. हा प्रस्ताव बँकेकडे शिफारशीसह पाठविण्यासाठी गोहाड यांनी ५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. अशी तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली. त्यांनी सुरुवातीस ५०० रुपये, फोन पे अँपवरून १ हजार रुपये आणि त्यानंतर २ हजार रुपयांची लाच घेतली. याप्रकरणी गोहाड यांना ताब्यात घेण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पुणे युनिटचे पोलिस निरीक्षक चिरनाथ माने तपास करीत आहेत.