संजय माने/लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : परराज्यातून गावठी कट्टे, पिस्तूल राजरोसपणे शहरात आणून विक्री केली जात असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. उत्तर प्रदेशातून येणारे पिस्तूल शहरात विक्री होत असल्याच्या घटना उघडकीस आल्या असताना, उत्तर प्रदेश (लखनौ) येथील पेट्रोल पंप घोटाळ्यातील आरोपींपैकी एक जण पिंपरी-चिंचवडमध्ये आढळून आला. पिंपरी-चिंचवडचे उत्तर प्रदेशमधील गुन्हेगारी क्षेत्रात कनेक्शन असून, अशा रॅकेटमधील सहभाग निदर्शनास आला आहे. लखनौ येथील पेट्रोल पंप घोटाळ्यातील आरोपी अविनाश मनोहर नाईक याला उत्तर प्रदेश पोलिसांनी रविवारी दुपारी दोनला आकुर्डी, जय गणेश व्हीजन येथील व्हिजिल सिस्टीम नावाच्या दुकानातून अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी १७७ रिमोट कंट्रोल, १८९ आर. एक्स़ रिसिव्हर, ५० रिमोट सेल, एक लॅपटॉप जप्त केला. उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष कृती दलाने अविनाशला अटक केली. उत्तर प्रदेशातील पेट्रोल पंप घोटाळ्यातील हा आरोपी पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष कृती दलाच्या हाती लागला. या घटनेने गुन्हेगारी क्षेत्रात पिंपरी चिंचवडचे कनेक्शन असल्याची प्रचिती आली आहे. उत्तर प्रदेशातून पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या एकाला खंडणीविरोधी पथकाने मोशी, बोऱ्हाडेवस्ती येथे दोन महिन्यांपूर्वी पकडले त्याच्याकडून एक पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे असा मुद्देमाल जप्त केला़ महंमद मोईन समीम उद्दीन ऊर्फ बाबू खान असे त्या आरोपीचे नाव होते. महंमद हा मूळचा उत्तर प्रदेश येथील ग्राम गंदियानी, तालुका सौराव, जिल्हा इलाहाबाद येथील रहिवासी असून तो मोशीतील आदर्शनगर येथे वास्तव्यास होता. त्याच्याकडून पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे असा मुद्देमाल जप्त केला होता. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, उत्तर प्रदेशातून पिस्तूल पुण्यात विक्रीसाठी आणल्याचे त्याने सांगितले होते. चंदन सुरेंद्र सिंग, चेतन विश्वकर्मा यांच्यावरही बेकायदा पिस्तूलप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.यूपीतील गुन्हेगार शहरात आश्रयालागावठी कट्टे, पिस्तूल विक्री असो की,पेट्रोल पंप घोटाळ्यासाठी वापरात येणाऱ्या इलेक्ट्रॉनिक्स चिप असोत, अशा चुकीच्या आणि अवैध कामांत सक्रिय असणारे गुन्हेगार पिंपरी-चिंचवडमध्ये आश्रय घेत असल्याचे अनेकदा निदर्शनास आले आहे. एवढेच नव्हे तर पुण्यातील बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी काही दिवस कासारवाडी आणि कुदळवाडी परिसरात वास्तव्यास असल्याचे उघडकीस आले होते. उत्तर प्रदेशमधील लखनौ शहरात पेट्रोल पंप चालकांशी संगनमत करून इलेक्टॉनिक्स चिपच्या माध्यमातून ग्राहकांना कमी पेट्रोल देऊन त्यातून नफा कमाविण्याचे उद्योग करणारे रॅकेट कार्यरत होते. इलेक्ट्रॉनिक्स चिप आणि रिमोटची तांत्रिक माहिती असलेला त्यात हेराफेरी करण्याचे कौशल्य आत्मसात असलेला या रॅकेटमधील आरोपी आकुर्डीत पोलिसांच्या हाती लागला. शहरातील गुन्हेगारीची पाळेमुळे उत्तर प्रदेशपर्यंत पोहोचली असल्याचे या घटनांच्या माध्यमातून पुढे आले आहे. गुन्हेगारांच्या माहितीचा अभावशहरात येऊन वास्तव्य करणाऱ्या परप्रांतियांची माहिती ठेवली जात नाही. कोणताही पुरावा नसताना, खातरजमा न करता त्यांना खोल्या भाड्याने दिल्या जातात. अशा प्रकारे वास्तव्य करणारे परप्रांतिय नेमके काम काय करतात. त्यांचे गुन्हेगारी क्षेत्राशी काही संबंध आहेत का? याची घरमालक आणि पोलिसांनाही माहिती नसते. गुन्हा घडल्यानंतर पोलिसांची धावाधाव सुरू होते. पोलिसांनी याबाबत योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
उद्योगनगरीत पिस्तुलांचा बाजार
By admin | Published: May 29, 2017 3:01 AM