पिंपरी : डान्स बार बंदीला स्थगिती देणारा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने १५ आॅक्टोबर २०१५ ला दिल्यानंतर हॉटेल व्यावसायिकांचा डान्स बार सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पनवेल येथील डान्स बारला हजेरी लावणाऱ्यांमध्ये शहरातील गुंठामंत्री, राजकारणी, व्यावसायिक यांचे प्रमाण मोठे आहे. ही बाब लक्षात घेऊन हॉटेल व्यवसायात गब्बर झालेल्या काहींनी या व्यवसायातील पुढचा टप्पा म्हणून डान्स बार सुरू करण्याची तयारी केली आहे. त्यामुळे काही दिवसांतच घाटाखालची छमछम आता हॉटेलांमध्ये कानी पडणार आहे. पनवेल येथे डान्स बारमध्ये हजेरी लावण्यासाठी शहरातून सायंकाळी पनवेलच्या दिशेने रोज मोटारी धावतात.पुणे-मुंबई महामार्गावरील येणे-जाणे त्यांच्यासाठी नित्याचेच बनले आहे. बारबालांवर पैसे उधळणे, मौजमजा करण्यासाठी हजारो रुपये खर्च करणारे या शहरात अनेक आहेत. द्रुतगती महामार्गाने पनवेलला जाणे, मद्यधुंद अवस्थेत रात्री घाट चढून परत येणे हे अनेकांच्या जीवावर बेतले आहे. पुणे-मुंबई महामार्गावर रात्री आणि पहाटेच्या वेळी होणाऱ्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यामागील हे एक कारण आहे. डान्स बारला ये-जा करणाऱ्यांमुळे या मार्गावरील अपघातांच्या प्रमाणात भर पडते. डान्स बारची मौज लुटण्यासाठी घाटाखाली जाणाऱ्यांना या शहरातच ही सेवा उपलब्ध करून देण्यासाठी काही व्यावसायिकांनी पुढचे पाऊल टाकण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या दहा वर्षांत येथील हॉटेल व्यवसायाचीही भरभराट झाली आहे. आलिशान हॉटेलांची संख्या वाढली आहे. हॉटेल व्यवसायाला सुगीचे दिवस आले आहेत. दहा वर्षांपूर्वी शहरात डान्स बार सुरू करण्याचा प्रयत्न झाला होता. त्या वेळी नागरिक, सामाजिक संघटनांनी कडाडून विरोध केला होता. सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्याने आता हा मार्ग मोकळा झाला आहे. (प्रतिनिधी)
उद्योगनगरीत छमछम?
By admin | Published: November 27, 2015 1:23 AM