पुणे : सोयाबीनच्या निकृष्ट बियाणांचा पुरवठा केल्यावरून कृषी आयुक्त कार्यालयाने राज्यातील ११ बियाणे कंपन्यांचा विक्री परवाना कायमचा रद्द केला. राज्यात १ लाख ६० हजार शेतकऱ्यांनी बियाणांबाबत तक्रार केली. ७७ तक्रारींच्या सुनावणीनंतर ही कारवाई झाली असून आणखी ४१ तक्रारींची सुनावणी लवकर होणार आहे, अशी माहिती कृषी आयुक्त धीरजकुमार यांनी दिली.
खरीप हंगामासाठी कंपन्यांनी शेतकऱ्यांना या बियाणांचा पुरवठा केला होता. त्याची उगवणच झाली नाही. त्यामुळे काही शेतकºयांनी तक्रारी केल्या. त्याची दखल घेत कृषी आयुक्त कार्यालयाच्या गुणवत्ता नियंत्रण पथकाने बियाणांची तपासणी केली. त्यात बियाणांमध्ये कमतरता आढळली. त्यामुळे तक्रारदार शेतकºयांच्या शेतातील बियाणांचा पंचनामा करून त्या कंपन्यांच्या विरोधात फिर्याद दाखल करण्यात येत आहे. निकृष्ट बियाणांमुळे राज्यातील सोयाबीनच्या ४३ लाख हेक्टरपैकी २० टक्के क्षेत्र बाधित होणार आहे. नांदेड, परभणी, हिंगोली, औरंगाबाद, अहमदनगर जिल्हे तसेच अन्य मोठ्या विभागांमधील सोयाबीन उत्पादक शेतकºयांना या निकृष्टबियाणांचा फटका बसला आहे.