लोकमत न्यूज नेटवर्कमंचर : तीव्र उष्णतेचा फटका टोमॅटोपिकाला बसला आहे. नवीन लागवड झालेली टोमॅटोची मर होण्याचे प्रमाण वाढले आहे, तसेच टोमॅटोपिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे.आंबेगाव तालुक्यात अगाद टोमॅटो लागवड शेतकरी मोठ्या प्रमाणावर करतो. लवकर लागवड केलेल्या टोमॅटोपिकाला चांगला बाजारभाव मिळत असल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. अनेक शेतकऱ्यांनी नर्सरीतून टोमॅटो रोपे आणून टोमॅटो लागवड केली आहे. मात्र तीव्र उष्णतेचा फटका टोमॅटोपिकाला बसतो आहे. सध्या दिवसभर उन्हाचा कडाका असतो, तर रात्रीसुद्धा उष्णता जाणवते. त्याचा परिणाम विविध पिकांवर झाला आहे.पिकावर उन्हाचा होणारा परिणाम कमी व्हावा, यासाठी शेतकरी उपाययोजना करत आहे. मात्र त्या तोकड्या पडत आहेत. टोमॅटोपिकाच्या बाजूला शेडनेड अथवा निवारा केला जातो. औषध फवारणीचे काम बहुधा रात्री केले जाते. मात्र या उपाययोजनांचा फारसा फायदा होताना दिसत नाही. टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचा भांडवली खर्च वाढला आहे. महागडी औषध फवारणी तसेच इतर उपाययोजना शेतकऱ्यांना कराव्या लागत आहेत.अतिशय उष्णतेने नुकतीच लागवड झालेल्या टोमॅटो रोपांची सर होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पुनर्लागवड करावी लागते. रोपांची डबल लागवड करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. काही भागात पाणी कमी प्रमाणात उपलब्ध असल्याने टोमॅटोची पाने आकसली आहेत. टोमॅटोच्या फळांवरसुद्धा अतिउष्णतेचा परिणाम झाला आहे. उष्णतेने रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे.कीटक, कोळी, पांढरी आळी, मावा यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. खोडकिड वाढणार आहे. उष्णतेचा परिणाम बहुतेक नगदी पिकांवर झाला असून पीक तजेलदार नाही. उत्पादनाचा दर्जा कमी होणार आहे.
टोमॅटोपिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव
By admin | Published: May 08, 2017 2:16 AM