लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : बदलत्या हवामानाचा परिणाम शेतीमालावर झाला आहे. यामुळे मार्केट यार्डात रविवारी फळभाज्यांची आवक गेल्या आठवड्याच्या तुलनेत कमी झाली. आवक कमी आणि मागणी वाढल्याने हिरवी मिरची आणि गाजराच्या दरात वाढ झाली आहे, तर अन्य फळभाज्यांचे दर स्थिर होते.
गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील तरकारी विभागात रविवारी (दि.१७) ९० गाड्या शेतीमालाची आवक झाली. यात परराज्यासह स्थानिक मालाचा समावेश आहे. परराज्यातून आलेल्या मालामध्ये राजस्थान येथून ७ ते ८ टेम्पो गाजर, गुजरात आणि कर्नाटकातून ४ ते ५ टेम्पो कोबी, आंध्र प्रदेश व तमिळनाडूतून २ ते ३ टेम्पो शेवगा, गुजरात, मध्यप्रदेश आणि कर्नाटकातून १० ते १२ टेम्पो हिरवी मिरची, मध्यप्रदेशातून मटार ८ ते १० ट्रक, मध्यप्रदेश आणि गुजरामधून ७ ते ८ ट्रक लसूण, आग्रा, इंदूर व स्थानिक परिसरातून बटाट्याची ३५ ते ५० ट्रक इतकी आवक झाली आहे. तर स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले ११०० ते १२०० गोणी, कोबी सुमारे ७ ते ८ टेम्पो, प्लॉवर १० ते १२ टेम्पो, भेंडी ७ ते ८ टेम्पो, गवार ५ ते ६ टेम्पो, सिमला मिरची १० ते १२ टेम्पो, टोमॅटो ८ ते १० हजार पेटी, भुईमूग शेंगा ७० ते ८० पोती, तांबडा भोपळा ८ ते १० टेम्पो, हिरवी मिरची ४ ते ५ टेम्पो, गवार ५ ते ६ टेम्पो, नवीन कांदा ११० ट्रक तर जुना कांदा २५ ट्रक इतकी आवक झाली.
--
भाजीपाला घाऊक दर किरकोळ दर
कांदा २०-२५ ३०-५०
बटाटा १५-२५ २०-३५
टोमॅटो ०५-०७ १०-१५
भेंडी २०-३० २५-४०
गवार ३९-४० ४०-५०
मिरची ३५-५५ ४५-६०
कोथींबीर ०७-१० १०-१५
मेथी ०७-०८ १०-१५
मटार १८-२० २५-३०
गाजर १५-१८ २०-२५
--
वातावरण बदलामुळे आवक कमी
मागील आठवड्यात झालेला पाऊस व त्यानंतर थंडी आणि उन्ह या वातावरणाचा फटका शेतीमालाला बसला आहे. याचा परिणाम मार्केट यार्डातील शेतीमालाची आवक कमी झाली आहे. आवक कमी झाली तरी मागणी स्थिर असल्याने गाजर आणि हिरवी मिरची वगळता सर्व फळभाज्यांचे दर स्थिर आहेत.
- विलास भुजबळ, व्यापारी