पिंपरी : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलिसांकडून देखील प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे. त्याअंतर्गत विदेशी पर्यटक, तसेच विदेशात जाऊन आलेल्या व विमानाने प्रवास करून शहरात आलेल्या नागरिकांची माहिती पोलिसांकडून घेण्यात येत आहे. याबाबत टुर्स अॅड ट्रॅव्हल्स कंपन्या, हॉटेल्स, लॉज आणि गेस्ट हाऊस आदींना सूचना देण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी याबाबत आदेश दिले आहेत. शहरातील विदेशी नागरिक तसेच पर्यटक व विदेशात जाऊन आलेल्या नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांची आरोग्य तपासणी करून, आवश्यकतेनुसार विलगीकरण महत्त्वाचे आहे. त्या अनुषंगाने त्यांची माहिती उपलब्ध होण्यासाठी शहरातील सर्व टुर्स अँड ट्रॅव्हल्स कंपन्या, हॉटेल्स, लॉज व गेस्ट हाऊस यांनी त्यांच्याकडील अशा नागरिकांची, पर्यटकांची माहितीची नोंद करावी, त्यासाठी स्वतंत्र नोंदवही करून संबंधित पोलीस ठाणे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षाला ही माहिती द्यावी. तसेच आवश्यकतेनुसार पोलिसांना अवलोकनार्थ वेळोवेळी ही नोंदवही उपलब्ध करून देण्यात यावी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत शुक्रवार, दि. १३ मार्च ते ११ मे २०२० या कालावधीसाठी हा आदेश लागू राहणार आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास किंवा विदेशी पर्यटक व विदेशातून जाऊन आलेल्या नागरिकांची माहिती उपलब्ध करून न दिल्यास भारतीय दंड विधान संहिता कलम १८८ नुसार कारवाई करण्यात येणार असल्याचेही आदेशातून स्पष्ट केले आहे.
विदेशी पर्यटक, विमान प्रवास केलेल्या नागरिकांची माहिती द्या : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2020 7:40 PM
टुर्स अॅड ट्रॅव्हल्स कंपन्या, हॉटेल्स, लॉज व गेस्ट हाऊसवाल्यांना सूचना
ठळक मुद्देविदेशात जाऊन आलेल्या नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याची शक्यतामाहिती उपलब्ध करून न दिल्यास कारवाई करण्यात येणार