पुणे : पावसाला जोरदार सुरुवात झाल्यावर होणाऱ्या अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी पुणे महापालिकेने तंत्रज्ञान वापरण्याचा निर्णय घेतला आहे. पाऊस सुरु असताना वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडण्याच्या घटना टाळण्यासाठी अशा धोकादायक वृक्षांची माहिती व्हॉट्स ऍपच्या माध्यमातून महापालिकेला कळवण्यात यावी असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. त्यासाठी ९६८९९००००२ हा क्रमांकही देण्यात आला आहे.
मागील आठवड्यात पुण्यात झालेल्या पावसात एकाला आपले प्राण गमवावे लागले तर खाजगी मालमत्तेचे लाखोंचे नुकसान झाले आहे. या प्रकारची हानी टाळण्यासाठी पालिकेने व्हॉट्स ऍप नंबर प्रसिद्ध केला असून त्यावर पुणेकरांना धोकादायक वृक्षाची माहिती आणि फोटो पाठ्वण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शहरात गेल्या ७ वर्षात ५ हजार ७० झाडपाडीच्या घटना घडल्या आहेत. या घटनेत अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत तर काही जखमी झाले. अन्य काही घटनांत वाहने व मालमत्तेचे नुकसान झाले. मात्र, एवढय़ा मोठय़ा संख्येने वृक्ष कोसळू लागल्याने शहरातील वृक्षांच्या अस्तित्वा विषयी प्रश्न निर्माण झाला असून नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. पालिकेकडून वृक्षांची गणना करण्यात आली मात्र त्यात धोकादायक वृक्षांची नोंद घेण्यात आली नाही. त्यामुळे पावसाळ्यात असे वृक्ष उन्मळून पडण्याचे प्रमाण मोठे आहे. अशा प्रकारे माहिती दिल्यास महापालिकेतर्फे माहितीची पडताळणी करून एक पथक घटनास्थळी तातडीने पाठवून योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.