पुणे: लसीकरण करणाऱ्या नागरिकांची सर्व गोपनीय माहिती महापालिकेतील भाजपा नगरसेवकांंना राजकीय हेतूने पुरवली जात असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला. या संदर्भात त्यांनी सायबर सेलच्या उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्याकडे लेखी तक्रारही दाखल केली आहे.
लसीकरणासाठी आधार कार्ड लागते. आधार कार्डला बँक खात्याची माहिती जोडली आहे. बँक खात्यात खातेदाराची सर्व प्रकारच्या मालमत्तेची माहिती आहे. त्यामुळेच लस घेणार्या नागरिकाची सर्व प्रकारची माहिती अतीशय गुप्त ठेवणे कायद्यानेच बंधनकारक आहे. असे असताना भाजपा नगरसेवकांकडे ही माहिती दिली जात असल्याचे जगताप यांचे म्हणणे आहे.
येरवडा येथील भाजपाचे नगरसेवक बापूराव कर्णे गुरूजी यांचे नावही जगताप यांनी तक्रारीत नमूद केले आहे. ते त्यांच्या मुलाच्या मोबाईलवरून त्यांच्या प्रभागातील लसीकरण झालेल्या नागरिकांना त्यांच्या मोबाईल क्रमाकांवर स्वतःच्या नावाचे प्रचारपत्रक पाठवत असल्याचे जगताप यांनी म्हटले आहे. लसीकरण झालेल्या नागरिकाचा मोबाईल क्रमांक त्यांंना कसा मिळाला, त्यांचे लसीकरण झाले हे कसे समजले. गोपनीय माहिती पुरवली गेल्याशिवाय हे शक्य नाही. भाजपाच्या किती नगरसेवकांनी हा प्रकार केला आहे, त्यांंना प्रशासनातील किंवा.आरोग्य व्यवस्थेतील कोण ही माहिती देत आहे, याची चौकशी करावी तसेच कर्णे पितापुत्रावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी जगताप यांंनी सायबर सेलकडे केली आहे.
राजकीय साधन शुचितेचा आव आणणाऱ्या भाजपाकडून पक्षांतर करून घेणे, प्रचाराची पातळी सोडणे असे प्रकार होतच असतात. आता गोपनियतेच्या कायद्याचा भंग करत सत्तेच्या जोरावर प्रशासनाकडून नागरिकांची गुप्त माहिती जमा करून त्याचा राजकीय वापर करण्याचा प्रकारही होत आहे. हा अतीशय गंभीर प्रकार असून.राष्ट्रवादी याची तड लावल्याशिवाय राहणार नाही असे जगताप यांनी सांगितले.