पिंपरी : महानगरपालिकेच्या वतीने नि:समर्थ अपंगासाठी विविध योजना दरवर्र्षी राबविण्यात येतात. मात्र या योजनेचा लाभ घेणारे खूप कमी आहेत. अधिकाधिक अपंगांना योजनांचा लाभ व्हावा याकरिता दर सहा महिन्यांनी योजना पालिकेच्या वतीने राबविल्या जात आहेत. मात्र, अजूनही अनेक अपंग केवळ अनभिज्ञतेमुळे योजनांच्या लाभापासून वंचित राहत आहेत.अंध अपंग, मूकबधीर, मतीमंद विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, अपंगाना चलन-वलन साधनांचे वाटप, अपंगाना एमएससीआयटी, अपंगाना अर्थसहाय्य, मनपा हद्दीतील ५ वर्षापुढील मतीमंद व्यक्तीचा सांभाळ करणाऱ्या संस्थाना अर्थसहाय्य, कुष्ठपीडीत व्यक्तिंना सहामाही वार्षिक अर्थसहाय्य, पीएमपीएल मोफत बसपास योजना अशा विविध योजना अपंगासाठी आहेत. महापालिका तसेच वायसीएम रुग्णालय यांच्या वतीने वेगवेगळ्या स्वरूपात योजना पुरविल्या जातात. एसटी, रेल्वेचा पास अपंगाना दिला जातो.मात्र विमानाचा मोफत पास आजही अपंगाना मिळत नाही. लघुउद्योगासाठी बीज भांडवल योजना तसेच बँकामार्फत मिळणाऱ्या कर्ज योजना या योजना अपंगाना मिळत नाहीत. एमआयडीसी व्यवसायासाठी अपंगाना २०० चौरस फुट जागा देण्याची तरतूद अपंगाना मिळत नाही. कागदपत्रे अपूरी असल्याचे सांगितले जाते. अपंगाना ३ टक्के जागा आरक्षित असल्याचा दावा केला जातो. मात्र, त्या वास्तव स्वरूपात मिळत नाहीत. योजना अपंगापर्यंत पोहचत नाहीत. राजीव गांधी योजनेचे अपंग असल्याचे प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी सासवड येथील शासकीय रुग्णालय व औंध रुग्णालयात जावे लागते. अपंगांना योजनेचा लाभ घेण्यासाठी दूरवरच्या अंतरावर जाणे शक्य होत नाही. अनेकजण नूतनीकरण प्रमाणपत्रापासून वंचित आहेत. हेलपाटे मारूनही तपासणी होत नाही. अपंगांनी अपंगत्वाचे भांडवल न करता त्यावर मात करावी, लाचार जीवन जगू नये, हॉकर्स झोनमध्ये अपंगाना जागा मिळण्यासाठी आयुक्तांकडे अनेकदा लेखी मागणी केली आहे, असे अपंग मित्र मंडळ विद्यालय, यमुनानगरचे संचालक विश्वनाथ वाघमोडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
अनभिज्ञतेमुळे योजनांपासून अपंग वंचित
By admin | Published: December 08, 2014 1:07 AM