पुणे : कुटुंबातली संस्कारमूल्ये आई-वडिलांच्या प्रति असलेला विश्वास, समर्पण वृत्ती, चारित्र्य, व्यवहार, कामाप्रति निष्ठा या सर्व गोष्टींमधून आपोआपच नव्या पिढीकडे वारसा जातो, असा संवादात्मक सूर ‘दोन पिढ्यांचा वारसा जपताना’ या कार्यक्रमात व्यक्त करण्यात आला. तीन पितापुत्रांच्या या आश्वासक संवादातून उपस्थितांच्या मनात आशेचा नवा किरण निर्माण झाला. युगल धर्मसंघ आणि सकल जैन संघाच्या वतीने ‘वारसा दोन पिढ्यांचा जपताना’ हा संवादात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ध्यानयोगी आचार्य प.पू. डॉ. शिवमुनीजी म.सा. आणि युवाचार्य प.पू. महेंद्रऋषीजी म.सा. आदिठाणा यांच्या सान्निध्यात हा कार्यक्रम रंगला. यामध्ये ‘लोकमत’ माध्यम समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा आणि लोकमतचे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा, संचेती हॉस्पिटलचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. के. एच. संचेती आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. पराग संचेती, घोडावत ग्रुपचे संस्थापक-अध्यक्ष संजय घोडावत आणि संचालक श्रेणिक घोडावत यांनी सहभाग घेतला. जैन सकल संघाचे अध्यक्ष विजयकांत कोठारी, कार्याध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल आणि महामंत्री विजय भंडारी, लखीचंद खिंवसरा यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. राजेश साकला, रमणलाल लुंकड, अॅड. एस. के. जैन यांच्या हस्ते मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. चकोर गांधी यांनी या तीन पिता-पुत्रांशी संवाद साधला. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात रंगलेल्या या संवादात नव्या पिढीने जपलेल्या वारशाचा आणि त्यांच्या पिता-पुत्रांच्या नात्याचा प्रवास उलगडला. वडिलांच्या नावासमोर टिकणे हे आव्हान वाटते का? असे विचारले असता, श्रेणिक यांनी होकारार्थी उत्तर दिले. सकाळी उठल्यावर नेहमी भीती वाटते, की ४० हजार लोक माझ्या निर्णयावर अवलंबून असतात. मी जर एखादी गोष्ट चांगली केली तर त्यांचेही चांगले होणार आहे, हाच विचार सतत मनात असतो. हा घराण्याचा वारसा पुढे कसा न्यायचा, याचा दबाव कायमच राहील, असे ते म्हणाले.डॉ. पराग यांनीही याला दुजोरा दिला. ते म्हणाले, ‘‘तुम्हाला सगळे आयते मिळाले आहे. त्या गोष्टी पुढे चालवायच्या आहेत, असे मला इतर लोक नेहमी म्हणत असत. हे मी करू शकलो नाही तर काय होईल? कारण बाबांनी वैद्यकीय क्षेत्रात एक ठसा उमटवला आहे. तेव्हा असे वाटत असे, की त्यांच्या कर्तृत्वापर्यंत आपण पोहोचू शकलो तर पुष्कळ आहे. कारण स्पर्धा ही घरातच आहे; त्यामुळे नेहमीच वेगळे करण्याचा ध्यास घेतला. तरीही सातत्याने तुलना होण्याची भीती असतेच.’’देवेंद्र दर्डा म्हणाले, ‘‘आमच्या दोन कंपन्या कुटुंबांची विभागणी करीत होत्या. आम्ही एकत्र येण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यासाठी एक फॅमिली चार्टर तयार केले. प्रत्येकाचा रस्ता मोकळा ठेवून त्याला काम करण्याचे स्वातंत्र्य मिळाले. यासाठी त्यागाची भावनाही महत्त्वाची आहे.’’विजय दर्डा वडील जवाहरलाल दर्डा यांच्या संस्कारांची आठवण सांगताना म्हणाले, की आम्हाला यवतमाळच्या महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षण घ्यायला लावले. दर शनिवारी वर्गातल्याच एका मुलाच्या घरी राहायला लावले. यामधून जीवन जगण्याची कला अवगत व्हायला पाहिजे, असा एक संस्कारच आमच्यावर रुजला. कारण आयुष्यातली प्रत्येक गोष्ट ही संस्कारमूल्यांशी निगडित असायला हवी.मुलांना तिजोरीच्या चाव्या दिल्या आहेत का? या मिस्कील प्रश्नावर टिप्पणी करताना विजय दर्डा म्हणाले, की चाव्या हळूहळू सरकावल्या जातात.डॉ. संचेती म्हणाले, ‘‘चावी दिली आहे; पण टप्प्याटप्प्याने. सुरुवातीला तो शस्त्रक्रिया करताना माझे लक्ष असे. पण त्याने माझ्यापेक्षा चांगल्या पद्धतीने अनेक शस्त्रक्रिया केल्या आहेत. तो एखादी जबाबदारी यशस्वीपणे पार पाडतो आहे, हे लक्षात आल्यावर मी त्यातून अंग काढून घेतले.’’मुलाला प्रत्येक गोष्टीत स्वातंत्र्य दिले आहे; पण महिन्यातून एकदा बॅलन्सशीट तपासावे लागते, असे संजय घोडावत गमतीने म्हणाले. यावर श्रेणिक म्हणाले, की अधिकार हे कमवावे लागतात. डॉ. पराग म्हणाले, की माझे बाबांशी अनेक विषयांवर मतभेदही झाले आहेत; पण त्यांना योग्य पद्धतीने समजावले तर ते मान्य करतात, हे मला कळून चुकले. अशाच पद्धतीने हळूहळू चाव्या आल्याचे त्यांनी सांगितले.वारशावर भाष्य करताना विजय दर्डा म्हणाले, ‘‘चरित्र, व्यवहार, विचार, प्रतिमा (समाज आणि कुटुंब) या सगळ्या वैशिष्ट्यांमधून वारसा निर्माण होतो. कुटुंबामध्ये वादविवाद होऊ नयेत, यासाठी त्याग, स्पष्टता, समान संधी आवश्यक आहे. परिवारात एकच नेतृत्व असले पाहिजे. समर्पण आणि निष्ठा यांतूनच तुम्हाला नेतृत्व मिळते.’’...............आपल्या माणसांना बोलावण्याची गरज नसते. देवेंद्र परदेशात गेल्यावर माझे मित्र मला नेहमी म्हणत असत, की ते भारतात परतून येणार नाहीत. मी फक्त स्मितहास्य करीत असे. त्यांना माहिती नव्हते, की देवेंद्रवर कोणते संस्कार आहेत आणि त्याची मुळं काय आहेत. मात्र, व्यवसायात येणे हे पूर्णत: त्याच्यावर निर्भर होते. -विजय दर्डा.................
कुटुंबाच्या व्यवसायात यायचे, हे आधीपासून ठरवले होते. लहानपणापासूनच आजोबा आणि वडील यांनी सुरू केलेल्या वृत्तपत्र व्यवसायात रस होता; मात्र वडिलांनी सांगितले होते, की परदेशातून येताना कोणत्याही कामाचा अनुभव घेऊन ये. त्यामुळे सिलिकॉन व्हॅलीमध्ये नोकरी केली. दरम्यान, वडील आणि काका (राजेंद्र दर्डा) राजकारणात गेले, तेव्हा व्यवसाय सांभाळण्यासाठी भारतात येण्याचा निर्णय घेतला. - देवेंद्र दर्डा
..........आपण केलेले संस्कारच इतके बळकट आहेत, की हा आपला वारसा नक्की पुढे नेणार, याचा विश्वास होता. त्याने स्वत:च अस्थिरोग विषय निवडला. आमचे वैद्यकीय पदव्युत्तर अस्थिरोग महाविद्यालय असूनही मी मुद्दाम त्याला शासकीय महाविद्यालयात शिकण्यास सांगितले. नंतर परदेशात पाठविण्याचा धोकाही पत्करला; पण त्याने परत येऊन नव्या दमाने रुग्णालयाची जबाबदारी घेतली. - डॉ. के. एच. संचेती.......................
मी लहानपणापासूनच बाबांना काम करताना बघत होतो. रुग्ण ज्या समाधानी वृत्तीने कृतज्ञता व्यक्त करून जायचे, ते पाहूनच बाबांविषयी प्रचंड अभिमान वाटत होता. बारावीतच ठरविले, की डॉक्टर व्हायचे. ९१ टक्के पडले आणि बीजे शासकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाला. बाबांनी थेट कधीच सांगितले नाही, की मी डॉक्टर व्हावे; पण त्यांची तीच मनापासून इच्छा होती. - डॉ. पराग संचेती..............व्यवसाय हा आमच्या रक्तातच आहे. मुलाला कोल्हापूरमध्ये शिक, असे सांगितले होते; पण तो बंगळुरूला गेला. व्यवसायात प्रवेश करण्यापूर्वी आमच्या एका तोट्यातील कंपनीमध्ये त्याला काम करण्यासाठी पाठविले. या कंपनीत काम केले तर तो कुठल्याही कंपनीत काम करू शकतो, असा विश्वास वाटला.- संजय घोडावत................
आम्ही जन्माला येतो तेव्हाच आमचे प्रशिक्षण सुरू होते. आजोबा आणि वडिलांना व्यवसायात पाहताना खूप काही शिकत होतो. बाबा नेहमी म्हणत, की मुलाला जे करायचे ते करू दे. त्याला चुकाही करू देत. कारण त्याच्याच चुकांमधून तो शिकत जाणार आहे. बाबांनी दिलेले हे स्वातंत्र्य खूपच प्रोत्साहन देणारे ठरले. संस्कारमूल्य आणि घरातील वातावरण व्यवसायात येण्यासाठी कारणीभूत ठरले. - श्रेणिक घोडावत