बारामती : श्रीक्षेत्र भगवानगड येथे राज्याचे दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविषयी शिवराळ भाषा वापरून टीका केली. तसेच, ‘बारामतीचे वाटोळे करीन’ अशीही धमकीवजा भाषा वापरली. त्याचा नगर पालिकेसमोरील प्रांगणात निषेध करण्यात आला. जानकर यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने टळला. पक्षाच्या निवडून आलेल्या आमदाराला मंत्रिपद दिले नाही. स्वत: मंत्री झाले. धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न बाजूला ठेवला. ज्या मतदारांनी मतदान केले, त्यांनादेखील विसरलेले, अशा शब्दांत आज बारामतीत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी जानकर यांचा समाचार घेतला. संभाजी होळकर यांनी महादेव जानकरांनी बारामतीचा स्वाभिमान दुखावला आहे. बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्र्याचा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घ्यावा, अशी मागणी केली. विश्वासराव देवकाते यांनी मी धनगर समाजाच्या वतीने जाहीर निषेध करतो. यापुढे खालच्या पातळीचे बेताल वक्तव्य केल्यास बारामतीमध्ये पाऊल ठेवू देणार नाही, असा इशारा दिला. या वेळी निवेदन नायब तहसीलदार पाटील यांच्याकडे देण्यात आहे. या मोर्चाचे आयोजन बारामती शहर राष्ट्रवादी यांच्या वतीने करण्यात आले होते.नगराध्यक्ष योगेश जगताप, पक्षाचे शहराध्यक्ष इम्तियाज शिकिलकर, तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, सुभाष ढोले, विश्वास देवकाते, मदनराव देवकाते, सतीश खोमणे, अमर धुमाळ, अशोक पिंगळे, वनिता बनकर, सीमा चव्हाण, अशोक शेंडे, अल्ताफ सय्यद, शिवाजी लकडे या पदाधिकाऱ्यांनी भाषणात निषेध व्यक्त केला. उपनगराध्यक्ष ज्योती बल्लाळ, सभापती करण खलाटे, राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा वंदना चव्हाण, अभिजित काळे, जय पाटील, जितेंद्र काटे, अविनाश काळकुटे या वेळी उपस्थित होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शहर पोलिसांनी बंदोबस्त वाढवला होता. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अमर धुमाळ यांनी या संदर्भात दुग्ध विकासमंत्री महादेव जानकर यांच्यावर गुन्हा दाखल करावा, असे निवेदन शहर पोलीस ठाण्यात दिले. डोर्लेवाडी येथेदेखील जानकर यांच्या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निषेध केला. ग्रामपंचायतीसमोर कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन त्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले. या वेळी माजी संचालक अशोक नवले, उपसरपंच कांतिलाल काळकुटे, विनोद नवले, अशोक काळकुटे, सोमनाथ नवले, राहुल कालगावकर, दत्ता नवले, कांतिलाल नाळे, सुभाष नाळे, अतुल भोपळे गुलाबराव कालगावकर, सागर नवले उपस्थित होते. (प्रतिनिधी)
जानकरांच्या वक्तव्याचा निषेध
By admin | Published: October 13, 2016 2:14 AM