मंचर: जालना येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या अमानुष लाठी हल्ल्याचा निषेध म्हणून आंबेगाव तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने बुधवार दि. ६ सहा रोजी आंबेगाव तालुका बंदची हाक देण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता तालुक्यातील सर्व व्यवहार बंद राहणार आहेत.
आंबेगाव तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीतील शरद पवार सभागृहामध्ये आज झालेल्या बैठकीत तालुका बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. जालना येथील मराठा आरक्षणा संदर्भात चालू असलेल्या आमरण उपोषणावर सरकारी यंत्रणेकडून अमानुष अत्याचार, लाठीहल्ला, गोळीबार उपोषण कर्त्यांवर करण्यात आला. त्याचा निषेध संपूर्ण आंबेगाव तालुका सकल मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत सर्व पक्षीय मराठा नेते कार्यकर्ते यांनी केला.
बुधवार दि. ६ रोजी संपूर्ण आंबेगाव तालुका बंद ठेवण्याचे एकमुखाने ठरविण्यात आले. मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी बंदला पाठिंबा दिला असून बुधवारी बाजार समितीतील कांदा, बटाटा, तरकारी व्यवहार बंद राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बुधवारी बाजार समितीत शेतमाल घेऊन येऊ नये असे आवाहन यावेळी करण्यात आले. या बंदमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत.दूध ,वैद्यकीय सेवा सुरू राहणार असल्याचे संयोजकांनी सांगितले.