पुणे : ‘भारतातील विविध नर्सिंग संस्थांसाठी अनेक संधी उपलब्ध आहेत. नर्स आणि मिडवायफरी प्रॅक्टिसची दिशा बळकट करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने पुढाकार घेतला आहे’, अशी माहिती भारतीय नर्सिंग कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. टी. दिलीप कुमार यांनी दिली. त्यांनी परिचारिकांना आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय राज्यस्तरीय आणि स्थानिक पातळीवरील करिअरच्या संधीविषयी मार्गदर्शन केले.
मिलिटरी नर्सिंग सेवा, केंद्र सरकारच्या संस्थांमधील विविध संवर्ग, कॉपोर्रेट हॉस्पिटल आणि संघटनांमध्ये तसेच नॅशनल हेल्थ मिशनअंतर्गत विविध नवीन पदे उपलब्ध असल्याची माहिती दिली. सिंबायोसिस कॉलेज आॅफ नर्सिंगतर्फे सोमवारी तिस-या आंतरराष्ट्रीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय नर्सिंग कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. टी. दिलीप कुमार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या आरोग्य विज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉ. राजीव येरवडेकर म्हणाले, ‘परिचारिकांच्या कौशल्यावर आधारित प्रशिक्षणावर भर देण्याची गरज आहे. यामुळे जागतिक स्तरावर काम करण्यासाठी परिचारिका सक्षम होतील.’ सिंबायोसिसच्या आंतराष्ट्रीय वेबिनारमध्ये अनेक तज्ज्ञांनी सहभाग नोंदवला. सिंबायोसिस कॉलेज आॅफ नर्सिंगचे संचालक डॉ एस.जी.जोशी यांनी प्रास्ताविक केले. डॉ. शीला उपेंद्र यांनी आभार मानले.