पिंपरी :चिंचवड स्टेशन येथील आनंदनगर झोपडपट्टी येथे दोन गटात हाणामारी झाली होती. यात गंभीर जखमी तरुणाचा शुक्रवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करत नातेवाईकांनी मृतदेह पोलिस उपायुक्त कार्यालयाबाहेर नेला. पोलिसांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले.
नरेश उर्फ कृष्णा भंडारी (रा. आनंदनगर झोपडपट्टी, चिंचवड स्टेशन) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंदनगर झोपडपट्टी येथे २५ ऑगस्ट रोजी दोन गटात वाद होऊन हाणामारी झाली. यात काही वाहनांची तोडफोड करण्यात आली. त्यावेळी नरेश भंडारी याच्या डोक्यात गट्टू मारल्याने तो गंभीर जखमी झाला. याप्रकरणी चिंचवड पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, उपचार सुरू असताना शुक्रवारी (दि. १) नरेश भंडारी याचा मृत्यू झाला. नातेवाईक आणि आनंद नगर झोपडपट्टीतील नागरिकांनी शनिवारी दुपारी मृतदेह चिंचवड येथे पोलिस उपायुक्त कार्यालयाबाहेर आणला. आरोपींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली. त्यावेळी पुणे -मुंबई महामार्गावर वाहनांचा खोळंबा झाला. पोलिसांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर मृतदेह आनंद नगर येथे नेण्यात आला. त्यावेळी आनंद नगर झोपडपट्टीत मोठी गर्दी झाली होती. पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात होता.