पुणे : रेल्वे मंत्रालयाच्या ‘देखो अपना देश’ आणि ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ योजनेंतर्गत ‘भारत गौरव पर्यटनरेल्वे’ चालवल्या जात आहेत. यामध्ये देशातील तीर्थक्षेत्रांना आणि पर्यटनस्थळांना भेटी देऊन देशातील समृद्ध सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांना दाखवण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने ही विशेष योजना सुरू केली आहे. या योजनेनुसार महाराष्ट्राला समृद्ध असा सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा लाभला असूनही अन्य राज्यांतून महाराष्ट्रात एकही ‘भारत गौरव रेल्वे’ आलेली नाही. आयआरसीटीसी मार्फत देशातील विविध ठिकाणांहून २८ ‘भारत गौरव रेल्वे’ चालवण्यात येत आहेत. पैकी पुण्यातून एक रेल्वे २८ एप्रिल रोजी सुटली तर दुसरी ११ मे रोजी सुटणार आहे.
महाराष्ट्रावर रेल्वे प्रशासनाने अन्याय केला असून, अन्य राज्यांमधून महाराष्ट्रासाठी ‘भारत गौरव रेल्वे’ सुरू करायला हव्यात, अशी मागणी जोर धरत आहे. राज्यात शिर्डी, त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर, महालक्ष्मी, वेरुळ-अजिंठा येथील जगप्रसिद्ध लेण्या, घृष्णेश्वर, महाबळेश्वर, अष्टविनायक, गणपती पुळे अशी प्रसिद्ध धार्मिक आणि पर्यटन स्थळे असताना महाराष्ट्राच्या बाबतीत रेल्वेने कोणताच विचार न केल्याचे यावरून स्पष्ट होते, यामुळे ‘देखो अपना देश’ आणि ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ योजनेंतर्गत सुरू असलेल्या भारत गौरव पर्यटन रेल्वेत महाराष्ट्राचाही समावेश करावा अशी मागणी रेल्वे सल्लागार समितीच्या सदस्यांसह, रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.