पुण्यातील काँग्रेस भवनात अभिनव उपक्रम! नागरिकांना विनामूल्य नादुरुस्त छत्री करून देणार दुरुस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2021 06:49 PM2021-06-14T18:49:30+5:302021-06-14T18:49:39+5:30
कोरोना टाळेबंदीत व्यवसाय मोडून पडलेल्या कारागिरांनाही चार पैसे मिळतील या उद्देशाने उपक्रमाची सुरुवात
पुणे: विनामूल्य छत्री दुरूस्त करून देण्याच्या काँग्रेसच्या ऊपक्रमातून नागरिकांची मदत होईलच शिवाय कोरोना टाळेबंदीत व्यवसाय मोडून पडलेल्या कारागिरांनाही चार पैसे मिळतील, ही खरी सामाजिक जाणिवेची गोष्ट आहे असे मत सामाजिक कार्यकर्त्या किरण मोघे यांनी व्यक्त केले.
काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मोहन जोशी यांनी काँग्रेस भवनमध्ये पक्षाच्या वतीने सुरू केलेल्या या अभिनव ऊपक्रमाला सोमवारी दुपारी मोघे यांच्या ऊपस्थितीत सुरूवात झाली. मोघे म्हणाल्या, कोरोनामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. एकमेकांना मदतीचा हात देत, बरोबर राहूनच या संकटावर मात करणे शक्य आहे, म्हणूनच काँग्रेसचे हे पाऊल महत्वाचे आहे.
जोशी यांंनी सांगितले की १९ जूनपर्यंत रोज सकाळी ११ ते सायंकाळी ६ या वेळात नागरिकांना त्यांची छत्री विनामूल्य दुरूस्त करून देण्यात येईल. केंद्र सरकारच्या धोरणांमुळे छोट्या व्यावसायिकांवर आर्थिक गंडांतर आले. त्यांना हातभार लावण्याचा उद्देश या उपक्रमामागे आहे असे जोशी म्हणाले.