धनकवडी : आंबेगाव बुद्रुक येथील अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमधील ९ वी, १० वी आणि १२ वीचे वर्ग विद्यार्थ्यांच्या किलबिलाटामध्ये उत्साहात सुरु झाले. शालेय शिक्षण विभागाने शाळा सुरु करण्यासाठी घातलेल्या सर्व नियम, अटी, निर्जंतुकीकरण, स्वच्छता आणि मार्गदर्शक सूचनांचे पालन करत आंबेगावच्या संकुलातील शाळा नुकतीच सुरु केली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील ९ महिन्यांपासून बंद असलेली शाळा विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमुळे गजबजली गेली होती. खूप दिवसांनी मित्रमैत्रीण भेटल्याने मुलेही आनंदी होती. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर झालेल्या या भेटीने मुले भारावली होती.
शासकीय आदेशानुसार सुरक्षित वावरचे निकष, सॅनिटायझरचा वापर, एक आड एक बसण्याची व्यवस्था, वर्गखोल्यांमध्ये येण्याजाण्याचे वेगवेगळे मार्ग, जागोजागी सूचना आणि नियम फलक, शिक्षकांची आर.टी. पी. सी. आर. चाचणी आदी नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करून शाळा सुरु केली. शाळेसाठी विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद असल्याचे संस्थापक अध्यक्ष राजीव जगताप यांनी सांगितले.
या वेळी सेक्रेटरी सुनीता जगताप, सहसेक्रेटरी निर्मोही जगताप, प्राचार्या वर्षा शर्मा उपस्थित होते.
फोटो ओळ : आंबेगाव बुद्रुक येथील अभिनव शाळा शालेय शिक्षण विभागाने घातलेल्या सर्व अटी आणि मार्गदर्शक सूचनांचे पालन करून नुकतीच सुरु करण्यात आली. यावेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या शरीराचे तापमान आणि ऑक्सिजनचे प्रमाण याची चाचणी करून वर्गात प्रवेश दिला.