पुणे - जगताना आता केवळ पैसे हाच महत्त्वाचा घटक राहिला नसून, आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित वातावरणात जगता येणे अधिक गरजेचे आहे. तशी परिस्थिती आपल्या सभोवताली निर्माण व्हायला हवी. आगामी काही वर्षांत पाण्याबरोबरच प्रदुषण मानवी आयुष्याच्या दृष्टीने अभ्यासाचा विषय असून, त्यावर संशोधन होणे महत्त्वाचे आहे. लायन्स क्लबच्या वतीने देखील यापुढील काळात विविध जिल्ह्यांमध्ये प्रदूषणावर मात हा अभिनव उपक्रम हाती घेतला जाणार आहे, असे मत लायन्स क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.प्रांतपाल रमेश शहा, दिनकर शिलेदार, शाम खंडेलवाल, ओमप्रकाश पेठे, दामाजी आसबे, अशोक मिस्त्री, के. एम. रॉय, अभय शास्त्री, के. हरिनारायणन, प्रवीण खुळे, हेमंत नाईक, नितीन शहा आदी मान्यवर उपस्थित होते. ‘लोकमत’चे संपादक विजय बाविस्कर यांनी स्वागत केले.शहा म्हणाले, वेगवेगळे सामाजिक उपक्रम आणि त्याची शिस्तबद्ध अंमलबजावणी, नागरिकांप्रती प्रामाणिकपणा आणि सेवा ही संस्थेची मुख्य वैशिष्ट्ये म्हणता येईल. गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांमध्ये पर्यावरणविषयक सजगता यावी यासाठी संस्थेच्या वतीने नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आले. या वर्षी संस्थेचे मुख्य उपक्रम हे पर्यावरणपूरक आहेत. विविध १०० उपक्रम हे संस्थेचे चालू वर्षीचे उद्दिष्ट असून, त्यात नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. दैनंदिन प्रदूषणावर मात करण्यासाठी संस्था आता प्रदूषण नियंत्रक शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी बसविणार आहे. या प्रदूषण नियंत्रकामुळे वाहनांचे प्रदूषण कमी करता येणे शक्य होणार आहे. वाहतुकीच्या दृष्टीने गर्दीच्या ठिकाणी ही यंत्रे बसविण्यात येणार असून शहरातील प्रशासनाची परवानगी मिळविण्याकरिता प्रयत्न सुरू आहेत.शाम खंडेलवाल म्हणाले, संस्थेच्या वतीने सूर्यनमस्कार शिबिर, विद्यार्थी दत्तक योजना, वृक्षारोपण, महिला आरोग्य जागरूक योजना, स्वच्छ भारत अभियान या प्रकारचे विविध सामाजिक उपक्रम राबविले असून, त्यानिमित्ताने समाजात आरोग्य, पर्यावरण, शिक्षण, सांस्कृतिकदृष्ट्या जागृती करण्याचे काम केले आहे.शिलेदार म्हणाले, मराठी भाषेच्या संवर्धनाकरिता संस्थेच्या वतीने अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे. उपक्रमात ज्येष्ठ कथाकार भारत सासणे यांना सहभागी करून घेतले आहे. भाषा बोलावी आणि ती टिकावी यासाठी दहावीच्या विद्यार्थ्यांची निबंध स्पर्धा, सातवीच्या विद्यार्थ्यांची हस्ताक्षर स्पर्धा घेतली जाणार आहे. तसेच भाषेच्या संदर्भात व्याख्यानमाला आयोजित करण्यात येणार असून, भाषेचे सांस्कृतिक महत्त्व वाढण्यासाठी वेगवेगळी निवेदने शासनाला सादर करणार आहे.प्रदूषण नियंत्रक कसे काम करणार?४.५ फूट उंची असलेले प्रदूषण नियंत्रक यंत्र हे हवेतील कार्बन ओढून शुद्ध हवा बाहेर सोडणार. या मशीनची किंमत ५० हजार असून रस्त्याच्या प्रत्येक चौकात ३ ते ४ मशीन लावल्या जातील.प्रत्येक क्लबला आपल्या परिसरातील एक चौक निवडून या उपक्रमामध्ये सहभागी होता येणार आहे. या मशीनमुळे ६० फूट परिसरातील २००० क्युबिक फिट पर मिनिट एवढी हवा शुद्ध करण्याची क्षमता आहे.या मशीनजवळून जाणाºयांना १ मिनिटात १०० लोकांना शुद्ध हवा एका मशीनद्ववारे मिळण्याची क्षमता आहे. यामुळे परिसरातील वाहनचालक, नागरिक यांना शुद्ध हवा घेता येणार आहे.गोवा, ठाणे या ठिकाणी हा उपक्रम यशस्वीरीत्या सुरू असून, पुढील काळात पुणे, नाशिक, मालेगाव येथे सुरू करण्यात येणार आहे.
प्रदूषणाच्या प्रश्नावर अभिनव उपाय, लायन्स क्लब ‘लोक मत’च्या व्यासपीठावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 3:04 AM