लोकमत न्यूज नेटवर्कघोडेगाव : माळीण पुनर्वसन गावठाणात पहिल्याच पावसात भराव खचल्याने रस्ता, गटार, लाईटचे पोल, पाइपलाइन, ड्रेनेज खचले. यामध्ये कोणतीही हानी नाही, त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही. मात्र पहिल्याच पावसात झालेली अवस्था पाहता याची वस्तुनिष्ठ चौकशी करून तसा अहवाल सादर करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी यांना दिल्या असल्याचे विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी माळीण येथे सांगितले.माळीणमध्ये जाऊन वळसे-पाटील यांनी पाहणी केली. या वेळी तहसीलदार रवींद्र सबनीस, सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता सी. टी. नाईक, पंचायत समिती उपसभापती नंदा सोनावले, जिल्हा परिषद सदस्य रूपा जगदाळे, प्रकाश घोलप, संजय गवारी, इंदुबाई लोहकरे आदी उपस्थित होते.वळसे-पाटील म्हणाले, ‘‘घरांना कुठल्याही प्रकारचा धोका झालेला नाही. ती चांगल्या अवस्थेत आहेत. काळजी करण्यासारखे कारण नाही. जागेबाबत जर कोणी आता प्रश्न उपस्थित करत असेल तर जागा निवडताना ग्रामस्थांची सहमती घेऊन व तज्ज्ञांची मदत घेऊन जागा निवडली गेली आहे. तसेच घरे बांधताना पक्की आरसीसी भूकंपविरोधी घरे बांधली आहेत. काल रात्री १०० मिमीच्या आसपास पाऊस पडल्याने हे पाणी गटारांमध्ये मावले नाही व त्यामुळे रस्ता खचल्याचा प्रकार घडलेला दिसतो. नवीन कामामध्ये सर्व स्थिरस्थावर व्हायला एखादा पावसाळा जाऊ द्यावा लागतो. दुर्दैवाने ही घटना घडली आहे, याची सर्व अधिकारी तज्ज्ञ मंडळी येतील पाहणी करतील व पुन्हा सुधारणा करतील. यामध्ये कुठल्याही प्रकारचे नुकसान झाले नाही. घाबरून जाण्यासारखे काही कारण नाही.’’ तसेच प्रत्यक्ष पाहणी केली असता मोठमोठ्या भरावांवर काम केल्यामुळे रस्ते, गटार, लाईटचे पोल, भिंती खचल्या आहेत, हे पाहता यामध्ये काही प्रमाणात त्रुटी असल्याचेदेखील दिसून येत आहे. याची वस्तुनिष्ठ चौकशी जिल्हाधिकारी यांनी करावी व तसा अहवाल सादर करावा. यामध्ये दोषी असणाऱ्यांवर कारवाई करावी, अशा सूचना वळसे पाटील यांनी जिल्हाधिकारी यांना दिल्या. तसेच जिल्हाधिकारी यांनीदेखील माळीणमध्ये सर्व अधिकाऱ्यांना बोलावून पाहणी करून तत्काळ दुरुस्तीचे काम हाती घेतले जाईल, असे सांगितले.
माळीणच्या नुकसानीची वस्तुनिष्ठ चौकशी करावी : वळसे-पाटील
By admin | Published: June 26, 2017 3:41 AM