पुणे : मिळकतकर भरण्यासाठी जुन्या नोटा रोख स्वरूपात स्वीकारण्याचा निर्णय झाल्यानंतर शहरातील अनेक मिळकतधारकांनी तब्बल १०० कोटी रुपये जमा केले. यामध्ये अडीच लाखांपेक्षा जास्त मिळकतकर रोख स्वरूपात भरणाऱ्यांची नावे आयकर विभागाला कळवून त्यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी नगरसेवकांनी मुख्य सभेत केली. मुख्य सभेच्या कामकाजाला सुरुवात करताना नोटाबंदीमुळे एकीकडे सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत असताना भाजपाच्या खासदारांकडून मात्र याबाबत बेताल विधाने केली जात असल्याचा निषेध मनसेच्या सभासदांकडून करण्यात आला. याविरोधात त्यांनी घोषणाबाजी केली. त्यानंतर नोटबंदीमुळे नागरिकांना सहन कराव्या लागत असलेल्या त्रासाबद्दल नगरसेवकांनी तीव्र भावना व्यक्त केल्या.सभागृह नेते बंडू केमसे म्हणाले, ‘‘काळ्या पैशांचे मूळ शोधून काढले पाहिजे. काळे धन हे रोख पैशांमध्ये खूप कमी असते, प्रत्यक्षात जमिनी, सोने यामध्ये ते मोठ्या प्रमाणात गुंतविण्यात आले आहे. त्यामुळे काळ्या पैशाला आळा घालायचा असेल तर याबाबत पहिल्यांदा पावले उचलली पाहिजेत.’’विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे म्हणाले, ‘‘काळा पैसा बाहेर काढण्यासाठी नोटा बंद करण्याचा पर्याय सर्वांत शेवटी उचलायला हवा होता. या निर्णयामुळे ३६ लोकांना बलिदान द्यावे लागले आहे.’’मनसेचे गटनेते किशोर शिंदे म्हणाले, ‘‘रांगेत थांबलेल्या लोकांची चेष्टा भाजपाच्या लोकप्रतिनिधींकडून केली जात आहे, ती चुकीची आहे. सगळ्यात जास्त काळा पैसा मोदींच्या गुजरातमध्ये होता; मात्र नोटा बदलणार असल्याची बातमी तिथल्या वृत्तपत्रात ६ महिन्यांपूर्वी छापून आली.’’भाजपाचे गटनेते गणेश बिडकर म्हणाले, ‘‘रेल्वे ट्रॅक बदलताना खडखडाट होतो, तसाच मोठा निर्णय घेतल्यानंतर त्याचे परिणाम हे जाणवणारच. नागरिकांना नोटा उपलब्ध करून देण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत.’’रिपाइंचे गटनेते सिद्धार्थ धेंडे म्हणाले, ‘‘नोटा बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर ज्या उपाययोजना व्हायला हव्या होत्या, त्या झालेल्या दिसून येत नाही.’’कमल व्यवहारे म्हणाल्या, ‘‘नोटा बंदच्या निर्णयामुळे काळ्या पैशांऐवजी ज्या महिलांनी बचत करून पैसे साठविले होते, त्यांचेच पैसे बाहेर काढावे लागले आहेत. महिलांनाच या निर्णयाचा सर्वाधिक त्रास झाला आहे.’’ मुदतीनंतर मोठ्या रकमेचा करभरणा करणाऱ्या नागरिकांची नावे आयकर विभागाला कळवावी, अशी मागणी दीपक मानकर यांनी केली. वसंत मोरे, सतीश मस्के, संजय बालगुडे, धनंजय जाधव, अविनाश बागवे, सुनील गोगले, अविनाश बागवे, माधुरी सहस्रबुद्धे यांनीही याबाबत विचार व्यक्त केले.(प्रतिनिधी)
करात गोलमाल करणाऱ्यांची चौकशी करा
By admin | Published: November 18, 2016 6:27 AM