लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : अनेक बड्या राजकीय पुढाऱ्यांसोबत निकटचे संबंध असलेल्या आणि राज्यमंत्री विश्वजित कदम यांचे सासरे असलेल्या बांधकाम व्यवसायिक अविनाश भोसले यांनी सक्तवसुली संचालनालयाने ''''''''ईडी''''''''ने चौकशी सुरू केली आहे. ईडीच्या परिमंडळ दोनच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी भोसले यांना चौकशीसाठी बोलावून घेतले होते. तब्बल आठ त्यांची चौकशी करण्यात आली. पुण्यातही त्यांच्या बंगल्यावर ईडीच्या पथकाने चौकशी केल्याचे समजते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडीने त्यांना मुंबईत बोलावल्यावर शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास ते ईडीच्या कार्यालयात हजर झाले. त्यांच्या कागदपत्रांची छाननी करण्यासोबतच अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे चौकशी केल्याचे सूत्रांनी सांगितले. शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर भोसले यांच्यावर झालेल्या कारवाईमुळे चर्चा सुरू झाल्या आहेत. चौकशी नेमकी कोणत्या मुद्द्यांवर करण्यात आली याबाबत माहिती मिळू शकली नाही.
भोसले यांच्यावर ईडीने यापूर्वी फेमा कायद्यांतर्गत कारवाई करीत १ कोटी ८३ लाखांचा दंड केला होता. २००७ साली अमेरिका आणि दुबई दौरा करून भारतात येताना परकीय चलन व महागड्या वस्तू अबकारी शुल्क (कस्टम ड्यूटी) न भरता चोरून आणल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली होती. त्यांचा पासपोर्टही जप्त करण्यात आला होता. शुक्रवारी त्यांची मुंबईत चौकशी सुरू होती. याच काळात पुण्यातही त्यांच्या घरी ईडीच्या पथकाने चौकशी केल्याची चर्चा सुरू झाली; मात्र त्यास अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही.
--------
शिवाजीनगरच्या यशवंत घाडगेनगरमधील जमीन बेकायदा हस्तांतरित केल्याच्या आरोपावरून भोसले यांच्यासह सहा जणांच्या विरोधात २०१६ साली चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांच्याविरुद्ध राजेश बजाज यांनी फिर्याद दिली होती.
-------
भोसले यांच्यावर यापूर्वी प्राप्तिकर विभागाने छापे टाकत महत्वाची कागदपत्रे जप्त केली होती. यावेळी त्यांचे जावई आणि काँग्रेसचे नेते विश्वजित कदम यांच्या कार्यालयावरही छापे टाकून कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली होती.
--