पुणे : समाज कल्याण विभागातर्फे विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती वितरणामध्ये सुमारे २ हजार कोटी रुपयांचा बेकायदेशीर आर्थिक व्यवहार झाल्याचा संशय आहे. या प्रकरणी प्रवर्तन निर्देशनालय (ईडी) कार्यालयाने राज्यातील समाज कल्याण विभागाच्या सर्व प्रादेशिक कार्यालयांकडे पत्रव्यवहार केला आहे. त्यामुळे पुण्यासह राज्यातील सर्व शिक्षण संस्थांच्या शिष्यवृत्ती वितरणाची माहिती तपासली जाणार आहे.
वर्धा येथील राष्ट्रभाषा प्रचार समिती ज्ञान मंडळाच्या विद्यार्थ्यांना बेकायदा शिष्यवृत्ती दिल्याची माहिती समोर आली होती. त्याचप्रमाणे काही संस्थांच्या शिष्यवृत्ती वितरणात गैरव्यवहार झाल्याप्रकरणी विशेष चौकशी पथकाने तपासणी केली होती. त्यात आक्षेपार्ह बाबी आढळल्या. त्यात समाज कल्याण विभागाने ओबीसी, व्हीजेएनटी आणि एसबीसी संवर्गातील विद्यार्थ्यांना वितरित झालेल्या तब्बल १७०० कोटी रुपयांच्या शिष्यवृत्तीत गैरव्यवहार झाल्याचे दिसून आले. त्यात एससी संवर्गातील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचाही समावेश आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी ईडी कार्यालयाकडे देण्यात आली. त्यावर ईडीने समाज कल्याण विभागाच्या राज्यातील सर्व प्रादेशिक कार्यालयांना पत्र पाठवून शिष्यवृत्तीची माहिती मागवली. प्रामुख्याने वर्धा येथे झालेला गैरव्यवहार महाराष्ट्रात इतर ठिकाणी झाला आहे का? याबाबत ईडीकडून तपासणी केली जात असल्याचे समाज कल्याण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.ईडी कार्यालयाने केलेल्या पत्रव्यवहारानुसार समाज कल्याण विभागाने सर्व शिक्षण संस्थांकडून २०१० ते २०१७ या शैक्षणिक वर्षातील शिष्यवृत्ती माहिती मागविली आहे. पुणे जिल्ह्यातील सुमारे १ हजार ६०० महाविद्यालयांना समाज कल्याण विभागाने पत्र पाठवले आहे. दिलेल्या मुदतीत महाविद्यालयांनी माहिती सादर केली नाही तर भविष्यात होणाºया परिणामास प्राचार्यांना जबाबदार ठरविण्यात येईल, याची गांभीर्याने नोंद घ्यावी, असे या पत्रात नमूद केले आहे.पुण्यासह राज्यातील सर्व प्रादेशिक समाज कल्याण कार्यालयांना ईडी कार्यालयाने शिष्यवृत्तीबाबत पत्रव्यवहार केला आहे. महाविद्यालयांनी माहिती पाठविण्यास सुरुवात केली असून, १५ नोव्हेंबरपर्यंत प्राप्त होणारी माहिती ईडीला सादर केली जाईल.- अविनाश देवसटवार, उपायुक्त, समाज कल्याण प्रादेशिक कार्यालय